औरंगाबाद: विधान परिषदेला आमचे सगळे उमेदवार निवडून आणणार, या खेळात माजी मुख्यमंत्री शतरंजचे बेताज बादशाह असून यावेळी वेगळ्या मार्गाने डाव टाकून आम्ही विजय मिळवणार, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज केला. कोणा एकाला नाही तर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाला भाजप हरवणार असेही केंद्रीयमंत्री खा. दानवे यावेळी म्हणाले.
केंद्रीय मंत्री दानवे पुढे म्हणाले, एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिली नाही तर भाजप ही निवडणूक बिनविरोध करेल अशी पक्षाची रणनीती नव्हती. केवळ एका नावाला नाही, आम्ही शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेसच्या विरोधात लढत आहोत. राज्यसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुद्धिबळाचे डाव टाकून विजय खेचून आणला. यावेळी दुसरा डाव टाकून विधानपरिषदेचे सर्व उमेदवार निवडून आणणार. हा निकाल धक्कादायक असेल हे मात्र नक्की, असा दावाही केंद्रीयमंत्री दानवे यांनी केला.
पंकजा मुंडे कोणाचेही ऐकणार नाहीत औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी पंकजा मुंडे यांनी भाजपला सोडून द्यावे, वेगळा पक्ष काढावा आम्ही पाठीशी उभा राहू असे वक्तव्य केले आहे. यावर दानवे यांनी सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणात दुसऱ्यांमध्ये खोडा घालता येईल यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतात. पंकजा मुंडे अशा कोणाचेही ऐकून निर्णय नाहीत घेणार. त्या पक्षाच्या राष्ट्रीय चिटणीस आहेत. पक्ष त्यांना योग्य ते ठिकाणी, योग्यवेळी चांगली जबादारी असेही केंद्रीयमंत्री दानवे म्हणाले.