औरंगाबाद : भरपूर पाऊस झाल्याने पाण्याने तुडुंब भरलेल्या हर्सूल तलावासह शहरालगतच्या अन्य तलावांत गणेशमूर्तीचे विसर्जन करता येणार नाही. तलाव परिसरात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. यामुळे तलावात विसर्जन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरिकांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी गुरुवारी दिला.
पोलीस आयुक्त म्हणाले, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सवाला सुरुवात झाली. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी श्री विसर्जन मिरवणूक काढण्यास परवानगी नाही. असे असले तरी विसर्जनाच्या दिवशी शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त असेल. गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी नागरिकांनी विसर्जन विहिरींवर गर्दी करू नये, याकरिता कॉलनीतील गणेश मंडळाच्या वाहनातून प्रत्येक घरातील मूर्ती संकलित केल्या जातील. जेथे मंडळ नाही अशा ठिकाणी पोलीस आणि महापालिकेच्या सजवलेल्या वाहनामधून सर्व मूर्ती जमा करून त्या मूर्तींचे विहिरीत विधिवत विसर्जन केले जाणार आहे. या उपक्रमाला नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी केले.
तलाव परिसरात लागू राहील कलम १४४भरपूर पाऊस पडल्याने हर्सूलसह मिटमिटा, पडेगाव, वाल्मी आणि देवळाई येथील तलाव पाण्याने तुडुंब भरले आहेत. गणपती विसर्जन करताना दुर्घटना होण्याचा धोका लक्षात घेता तलावात गणेशमूर्ती विसर्जनास परवानगी नाही. एवढेच नव्हे तर तलाव परिसरात कलम १४४ लागू करण्यात येणार आहे. यामुळे तलावात मूर्ती विसर्जनाचा प्रयत्न करणाºया व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल.
कायगाव टोका येथे जाण्यास मनाई : शहरातील हजारो भाविक दरवर्षी श्री विसर्जनासाठी वाहनाने कायगाव टोका येथे जातात. यावर्षी कोरोनामुळे गणेशभक्तांना कायगाव टोका येथे जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त : विसर्जन मिरवणूक नसली तरी शहरात नेहमीसारखा तगडा पोलीस बंदोबस्त असेल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. शहर पोलिसांच्या मदतीला रॅपिड अॅक्शन फोर्स आणि राज्य राखीव दलाची प्रत्येकी एक कंपनी आणि ३५० होमगार्ड तैनात असतील.