छत्रपती संभाजीनगर : रामनगरजवळ हॉस्पिटलच्या किचनमध्ये साप निघाल्यामुळे नर्स व कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली, साप.. साप म्हणत कर्मचारी ‘भुर्रर्र’ पळाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली.
सर्पमित्राला पाचारण करण्यात आले. दडून बसलेली धामण सर्पमित्र मनोज गायकवाड यांनी शिताफीने पकडली. स्वत:ची सुटका करण्यासाठी तिने धडपड केली. मनोज यांनी तिला तिच्या अधिवासात सोडून दिले. उंदराच्या शोधात चुकून हा साप आला होता. त्यावेळी कर्मचाऱ्यांची सळसळत्या धामणीवर नजर पडली अन् एकच गोंधळ उडाला. सध्या पावसाळी वातावरण असून, दमट वातावरणामुळे साप बाहेर पडतात. त्यातीलच ही घटना होती. साप पकडला गेल्यावर कर्मचाऱ्यांनी मोकळा श्वास घेतला.
साप घरात येऊ नये म्हणून काय करावे ...- परिसर स्वच्छ ठेवणे .-घरामध्ये उंदीर किवा बेडूक येणार नाही याची काळजी घ्यावी.-शिल्लक राहिलेले अन्न कचराकुंडीत टाकावे .-घराच्या दरवाजाच्या खाली गॅप असेल तर तो कापड लावून बंद करावा.-साप लपतील अशी ठिकाणे नष्ट करावीत .-बेसिनच्या खाली असलेली जाळी फिट करून घेणे.-विटांचा ढिगारा, पालापाचोळा घराजवळ साचू देऊ नये.-एवढी काळजी घेऊनही साप तुमच्या घराच्या परिसरात आलाच तर सर्पमित्रांशी संपर्क साधा. सापाला मारू नका, तो निसर्गात समतोल राखतो, हे मानवाने लक्षात ठेवावे.