--------------------
तीसगाव परिसरातून दोन दुचाकी लंपास
वाळूज महानगर : तीसगाव परिसरातील अष्टविनायक पार्क येथून दोन दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनायक किशन पवार (रा. आष्टविनायक पार्क, तीसगाव) यांनी घरासमोरील पार्किंगमध्ये २६ जूनला रात्री दुचाकी (एम.एच. २४ बी.जे. ०४७६) उभी केली होती. याच अपार्टमेंटमधील विकास शिवाजी नागरे यांची दुचाकी (एम.एच. २८ ए.एल. ८२४८) चोरट्याने संधी साधून चोरून नेली.
---------------------
मुलासह महिला बेपत्ता
वाळूज महानगर : रांजणगावातून दीड वर्षाच्या मुलासह महिला बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीने पोलीस ठाण्यात दिली आहे. अलका रामेश्वर दौंड (२४) ही महिला आपला दीड वर्षाचा चिमुकला आयुष यास सोबत घेऊन मंगळवारी (दि.२९) सकाळी १० वाजेच्या सुमारास घराला कुलूप लावून निघून गेली आहे. सर्वत्र शोध घेऊन पत्नी व मुलगा मिळून न आल्याने रामेश्वर दौंड यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
फोटो - अलका दौंड, आयुष दौंड
-----------------
कब्रस्तान प्रवेशद्वारासमोर अस्वच्छता
वाळूज महानगर : पंढरपुरातील कब्रस्तानच्या प्रवेशद्वारासमोर केरकचरा टाकला जात असल्याने अस्वच्छता पसरली आहे. या भागातील व्यावसायिक व नागरिक केरकचरा प्रवेशद्वारासमोर टाकत असल्याने या ठिकाणी कचऱ्याचा ढीग साचला आहे. या कचऱ्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत असून मोकाट जनावरांचा संचारही वाढला आहे. उघड्यावर केरकचरा टाकणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
-------------------------
बजाजनगरात गतिरोधक उभारा
वाळूज महानगर : बजाजनगरात सुसाट धावणाऱ्या वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी गतिरोधक उभारण्याची मागणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून होत आहे. बजाजनगरात दुचाकीस्वार धूम स्टाइलने दुचाकी पळवीत असतात. याच बरोबर चारचाकी वाहनधारकही वाहने सुसाट पळवीत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्य चौकात गतिरोधक उभारण्याची मागणी अर्जुन आदमाने, सिद्राम पारे, नारायण हातोळे आदींनी केली आहे.
----------------------