छत्रपती संभाजीनगर : दरवर्षी विजयादशमीच्या दिवसी बुद्धलेणीच्या पायथ्याशी ‘धम्मभूमी’ येथे धम्मचक्र अनुप्रवर्तनाचा उत्सव साजरा करण्यासाठी केवळ छत्रपती संभाजीनगर शहरातीलच नव्हे, तर जिल्ह्याच्या आजूबाजूचे लाखो बौद्ध अनुयायी एकवटले जातात. ही परंपरा मागील ४३ वर्षांपासून निरंतरपणे सुरू आहे. विशेष म्हणजे, या परिसरातील लेणीमध्ये राहून शेवटपर्यंत बौद्धधम्माचा प्रसार आणि प्राचार करणारे बौद्ध भिक्खू उपाली यांचे निर्वाणही याच ठिकाणी झाले आणि त्यांच्या ‘धम्मभूमी’ परिसरातच अंत्यसंस्कार करण्यात आला. अशा या पावनभूमीचा बौद्धांचे श्रद्धास्थान म्हणून राज्यभरात लौकिक वाढला आहे.
बुद्धलेणीच्या पायथ्याशी ओसाड माळरानात असलेली ‘धम्मभूमी’ ही उदयास कशी आली, याविषयी भदन्त विशुद्धानंदबोधी महास्थवीर हे सांगतात की, साधारणपणे १९८० चे ते वर्ष होते. बौद्धभिक्खूची उपसंपदा घेतल्यानंतर विशुद्धानंदबोधी हे थायलंडला गेले. तिथे भदन्त बोधिपालो महाथेरो व थायी भिक्खूंना भेटले. धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरातील विद्यापीठाच्या बाजूला बुद्धलेणीच्या पायथ्याशी १०० प्राध्यापक, अधिकारी, वकील व समाजातील काही प्रतिष्ठित मंडळीला श्रामणेर प्रवज्जा देण्याचा मानस बोलून दाखविला. तेव्हा थायलंडच्या भिक्खूंनी दिलेले १०० चिवर, तेवढेच दानपात्र व आवश्यक वस्तू घेऊन ते शहरात दाखल झाले. त्यांनी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत १० दिवसांचे श्रामणेर शिबिर यशस्वी केले. तेथून पुढे आजपर्यंत श्रामणेर शिबिराची परंपरा अखंडितपणे सुरू ठेवली आणि विजयादशमीच्या दिवशी सुरुवातीला शे-पाचशे अनुयायांच्या उपस्थितीत होणाऱ्या उत्सवाला आता लाखोंची गर्दी होत आहे.
सुरुवातीला येथे पाणी, रस्ता, वीज उपलब्ध नव्हती. तशाच परिस्थितीत तिथे भिक्खू राहतात आणि धम्माचा प्रसार आणि प्रचार करतात, हे तत्कालीन महापालिका आयुक्त मुन्शीलाल गौतम यांनी पाहिले आणि त्यांनी धम्मभूमीसाठी पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली. तत्कालीन नगरसेवक रशीदमामू यांनी पहिल्यांदा रस्ता तयार करून दिला. त्यानंतर तत्कालीन गृह राज्यमंत्री राजेंद्र दर्डा यांनी याठिकाणी भव्य समाजमंदिर उभारले. ते आज विपश्यना विहार म्हणून लोकप्रिय झाले. आता विशुद्धानंदबोधी विहार या नावाने ते ओळखले जाते. पुढे ॲड. प्रीतमकुमार शेगावकर, अलीकडे आ. प्रदीप जैस्वाल, खा. इम्तियाज जलील यांनीही रस्त्यासाठी योगदान दिले. सद्य:स्थिती या ठिकाणी १२ कुटी उभारण्यात आल्या असून, सुमारे २० भिक्खूंची तिथे निवासाची व्यवस्था आहे.
‘सीमा’चा उद्देश साध्य झाला नाहीयाठिकाणी भन्तेजींना उपसंपदा देण्यासाठी १५ वर्षांपूर्वी ‘सीमा’ कुटी तयार करण्यात आली होती. मात्र,अनेकांना बुद्धगया येथील महाबोधी महाविहारातच उपसंपदा घेण्याची इच्छा असल्यामुळे येथील ‘सीमा’ कुटीमध्ये आतापर्यंत उपसंपदेचा कार्यक्रम झालाच नाही. त्या कुटीत आता श्रामणेरांना प्रवज्जा दिली जाते.