छत्रपती संभाजीनगर : बुद्धलेणीच्या पायथ्याचे विपश्यना केंद्र आणि विहार हे विद्यापीठ जागेच्या बाहेर आहे. तरीही खोडसाळपणे या पवित्र स्थळाला अतिक्रमण समजून नोटीस बजावली आहे. याच्या पाठीशी कोण आहे, याचा शोध घ्यावा, या स्थळाचा बौद्ध सर्किटमध्ये समावेश करून शासनाने तेथे पुरेशा सोयी-सुविधा द्याव्यात, या मागणीसाठी दि. ७ ऑक्टोबर रोजी विराट मोर्चा काढण्यात येणार आहे, असे पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले.
यावेळी प्रकाश निकाळजे, गौतम खरात, गौतग लांडगे, ॲड. रमेशभाई खंडागळे, संजय जगताप, दीपक निकाळजे, अरुण बोर्डे आदींनी सांगितले की, मागील ५५ ते ६० वर्षांपासून बुद्धलेणीच्या पायथ्याशी बुद्धविहार आणि विपश्यना केंद्र आहे. दरवर्षी याठिकाणी लाखो देश-विदेशातील बौद्ध अनुयायी, अभ्यासक भेट देतात. विशेष म्हणजे, वनविभाग आणि पुरातत्व विभागाच्या जागेवर हे स्थान असून, विद्यापीठाचा या जागेशी कसलाही संबंध नाही. तरिदेखील बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक जगताप यांनी अतिक्रमण काढून घेण्याची नोटीस कोणाच्या सांगण्यावरून बजावली.
या घटनेमुळे बौद्ध समाजाच्या भावना दुखावल्या आहे. या घटनेच्या मागील सूत्रधाराचा शोध घेण्यात यावा. या बुद्धलेणी, विहार आणि विपश्यना केंद्राचा समावेश बौद्ध सर्किटमध्ये करून शासनाने तिथे पुरेशा सुविधा द्याव्यात, याठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ५० एकर जागा द्यावी, बुद्धलेणी व परिसराला तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करावे, या अन्य मागण्यासाठी सोमवार, दि. ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ‘धम्मभूमी के सम्मान मे, हम सब मैदान मे’ हा विराट मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर नेला जाणार आहे.
यावेळी भदन्त नागसेनबोधी महाथेरो, भन्ते संघप्रिय, भन्ते बोधीधम्म, भन्ते उपाली, भन्ते निर्वाण, भन्ते आनंद यांनी भिक्खू संघाच्या वतीने भूमिका मांडली. दौलत खरात, जालिंदर शेंडगे, किशोर थोरात, सचिन निकम, बंडू कांबळे, विजय वाहुळ, आनंद कस्तुरे, अमित वाहूळ आदींसह आंबेडकरी चळवळीतील विविध पक्ष-संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.