वाळूज महानगर: वाळूज एमआयडीसीत दोन दिवसांपूर्वी धम्मपाल साळवे याचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी मृताचे नातेवाईक व दोन सुरक्षारक्षकांचे जबाब नोंदविण्यात आले आहे.
वाळूज एमआयडीसीतीतील शॉर्प इंडस्ट्रिजसमोर १५ मार्चला धम्मपाल शांतवन साळवे या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. मृत धम्मपालच्या खिशात सापडलेल्या आधारकार्डावरुन त्याची ओळख पटविण्यात आली. शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर धम्मपालचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृत धम्मपाल हा दोन वर्षांपूर्वी मालुंजा येथून रोजगाराच्या शोधात वाळूज एमआयडीसीत आला होता. परिसरातील एका कंपनीत काम करुन तो बजाजनगरात पत्नी व मुलासह राहात होता. खुनाच्या घटनेच्या दोन-चार दिवसांपूर्वी त्याची पत्नी ही माहेरी निघुन गेली होती.
धम्मपालचे कुणाशी वैर होते का, या बाबत पोलिसांनी त्याचा भाऊ विजयकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, विजयने राख व इतर धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर जबाब देणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, शॉर्प इंडस्ट्रीच्या दोन सुरक्षारक्षकांचे जबाब नोंदविण्यात आले आहे.