छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होत आहे. मराठवाडा सास्कृतिक मंडळाच्या मैदानावर होत असलेल्या या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीचे अनेक नेते उपस्थित आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
भाजपने एप्रिल फूल बनवलं
यावेळी धनंजय मुंडे म्हणाले की, औरंगाबादचे नामांत्तर संभाजीनगर करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाला. काल 1 एप्रिल म्हणजेच एप्रिल फूल दिवस झाला. येत्या 6 एप्रिलला भाजपचा स्थापना दिवस आहे. पण, 2014 मध्ये सत्ता आल्यापासून देशातल्या आणि राज्यातल्या जनतेला भाजपने एप्रिल फूल बनवलं आहे. मागील 10 वर्षांपासून भाजपकडून जनतेची चेष्टा सुरू आहे. त्यामुळे त्यांचा वर्धापनदिन जनता साजरा करेल.
...मातीत गाडलंय
ते पुढे म्हणतात, महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला घाबरुन सरकारमधल्या पक्षांनी एक यात्रा सुरू केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधातील मविआची सभा क्रांतीकारी ठरेल. जिथे वज्रमूठ सभा होईल तिथे त्यांची यात्रा येणारच आहे. आम्ही नुसती वज्रमूठ आवळली तरी त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. इथून पुढे महाविकास आघाडी एकत्रपणे निवडणुका लढणार आहे. ज्या-ज्या वेळी दिल्लीश्वरांनी महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहिलं, त्यावेळी मराठवाड्याच्या लोकांनी त्यांना मातीत गाडलंय, असंही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.
मुंडेंनी सांगितली राहत इंदौरींची आठवण
'मी राहत इंदोरींची मुलाखत ऐकली होती. त्यांनी आणीबाणीचा काळ सांगितला होता. ते म्हणाले, त्या काळात मी सरकारला चोर म्हटलं होतं. तर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी मला ठाण्यात बोलवून चौकशी केली की, तुम्ही सरकारला चोर कसं म्हणालात? इंदोरी म्हणाले, मी भारत किंवा पाकिस्तान किंवा अमेरिकेच्या सरकारला चोर म्हटलेलं नाही. मी तर फक्त सरकार चोर आहे असं म्हणालो. पोलीस म्हणाले, इंदौरी साहब, आप हमें इतना बेवकूफ समझते हो, हमें मालूम नहीं कौन सी सरकार चौर है?, असा टोलाही मुंडे यांनी यावेळी लगावला.