औरंगाबाद : महावितरणने थकीत वीज बिल वसुली व वीजचोरी रोखण्यासाठी अनेक प्रयत्न करूनदेखील फारसे यश आले नाही. आता वीजचोरी रोखण्यासाठी जनतेचे उद्बोधन धर्मगुरूंकडून करण्याचा फंडा वापरला जाणार असून, यासाठी धर्मगुरूंची बैठकही महावितरण घेत असल्याची माहिती महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या काही वर्षांपासून औरंगाबाद परिमंडळांतर्गत वीज ग्राहकांकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी घरगुती ग्राहक, कंपन्या, व्यापारी, कृषिपंप ग्राहकांकडे आहे. त्यामुळे महावितरणला सध्या अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. वीजचोरी रोखणे, थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने विविध उपाययोजना केल्या. दुस-या मंडळातील कर्मचा-यांच्या पथकांकडून घरोघरी जाऊन वीजचोरीचा आढावा घेतला. थकबाकी वसुलीची मोहीम राबविली. पोलिसांना सोबत घेऊन वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम राबविली; परंतु वीजचोरी पूर्णपणे थांबलेली नाही. यावर उपाययोजना म्हणून महावितरणने आता धर्मगुरूंचा आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे. धर्मगुरू, पुजारी, कीर्तनकार, प्रबोधकार आदींच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. धर्मगुरूंनी वीजचोरी करणे पाप आहे, चोरी करू नये, असा उपदेश कीर्तन, प्रवचन, व्याख्यान आदी कार्यक्रमांच्या माध्यमातून देऊन जनजागृती करावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. यासाठी आज मुस्लिम धर्मगुरूंसोबत चर्चा झाली.
लवकरच अन्य धर्मांतील प्रमुख व्यक्तींची बैठक महावितरण कार्यालयात घेण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य अभियंता गणेशकर यांनी दिली.गणेशकर म्हणाले की, महावितरणने घरोघरी जाऊन मीटर तपासणी मोहीम सुरू केली आहे. यामध्ये ४५० घरांमध्ये वीजचोरी आढळली. ५०० मीटर जप्त केले आहेत. यामुळे शहरात सुमारे १८ लाख १८ हजार युनिटची चोरी अर्थात या युनिटसाठी महावितरणला महापारेषण कंपनीकडे सुमारे एक कोटी रुपये द्यावे लागत होते. यापुढेही ही कारवाई सुरूच राहील. उद्यापासून ३५० कर्मचा-यांची पथके शहरातील विविध भागांत घरोघरी जाऊन मीटरची तपासणी करणार आहेत. येणाºया काही दिवसांत वीजचोरी ब-यापैकी कमी होईल, अशी अपेक्षा आहे.
हायव्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टीम बसवणारज्या भागात ७० टक्क्यांपर्यंत वीजचोरी आहे. त्या ठिकाणी एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत एरिअल बंच केबल (ए. बी. केबल) व हाय व्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टीम (एचव्हीडीएस) बसविण्यात येणार आहे. यामुळे वीजचोरीवर नियंत्रण मिळवता येईल. अशा प्रकारची सिस्टीम शहराच्या विविध ६० ठिकाणी बसवण्यात येणार असल्याची माहिती गणेशकर यांनी दिली. ए.बी.केबल व एचव्हीडीएस सिस्टीमच्या कामाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, फेब्रुवारीपर्यंत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.