औरंगाबाद: प्रख्यात दिग्दर्शक नागराज मंजुळे साधेपणासाठी प्रसिद्ध आहेत. न केवळ बोलण्यात तर वागण्यात देखील मंजुळे यांचा साधेपणा दिसून येतो. दरम्यान, शहरातील हरहुन्नरी कलाकार प्रवीण डाळींबकर याने घरी येण्याची विनंती केली तेव्हा नागराज मंजुळे यांनी सहज होकार दिला. शुक्रवारी ते डाळींबकर याच्या शहरातील भीमनगर येथील घरी पोहोचले. यावेळी भीमनगर वासियांनी मंजुळे यांचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत केले.
नागराज मंजुळे यांनी ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘झुंड’ असे दर्जेदार चित्रपट दिले आहेत. आता अगदी नावापासून वेगळा असलेला ‘घर बंदूक बिर्याणी’ हा चित्रपट ते घेऊन येत आहेत. या चित्रपटात दिग्गज कलाकारांसोबत औरंगाबादचा प्रवीण डाळींबकर याची देखील भूमिका आहे. सध्या नागराज औरंगाबादमध्ये आहेत. याच दरम्यान, प्रवीण याने नागराज यांना घरी येण्याची विनंती केली. अगदी सहज नागराज यांनी होकार दिला. त्यानंतर ते थेट भावसिंगपुरा-भीमनगर येथील प्रवीणच्या घरी निघाले. दरम्यान, नागराज आल्याचे कळताच भीमनगर वासियांनी ढोल ताशाच्या गजरात त्यांचे स्वागत केले. औरंगाबादच्या या स्वागताने नागराज मंजुळे देखील भारावून गेले. नेहमी मोठ्या पडद्यावर, टीव्हीवर दिसणारे मंजुळे थेट समोर पाहून अनेकांना विश्वास बसत नव्हता.
नागराज यांनी देखील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना वेळ दिला. प्रवीण याच्या घरी भेट देऊन नागराज मंजुळे पुढे निघाले. पण त्यांच्या साधेपणाची चर्चा अजूनही भीमनगरमध्ये सुरु आहे. भीमनगरात काही काळा साठी एक वेगळाच माहोल तयार झाला होता. अख्खं घर भरल होत लोकांनी. हे पासून उर मात्र भरून आला होता फक्त आज आई- तात्याची आठवण आली, ते आज असते तर मी भरुन पावलो असतो अशा भावना प्रवीण याने सोशल मीडियात व्हिडीओ पोस्ट करत व्यक्त केल्या आहेत.
आपलेच लोक आपल्याला मोठा करतात मी २००६ साली मुंबईला अभिनय करण्यासाठी गेलो. त्यानंतर सैराट आला. मला वाटले नव्हते त्यांच्या सोबत काम करेल. ते शहरात असल्याने त्यांना सहज घरी येण्याची विनंती केली. तेव्हा त्यांनी होकार दिला आणि घरी आले. यावेळी आपल्याला आपलेच लोक हिरो करतात. आपल्याला त्यांच्यासमोर माणूस म्हणून राहावे लागेल, असे नागराज मंजुळे म्हणाले. - प्रवीण डाळींबकर, अभिनेता