छत्रपती संभाजीनगर : खचाखच भरलेले नाट्यगृह...विद्यार्थ्यांचा जल्लोष अन् एकाहून एक अशा सरस लोक आदिवासी नृत्याची पेशकश. असे मनमोहक दृश्य पाहायला मिळाले नाट्यरंग रंगमंचावर. कोणी कोळीगीतावर नृत्याचे सादरीकरण केले, तर कोणी अहिराणीतील गीताचे सादरीकरण केले. पैठण तालुक्यातील ताराई महाविद्यालयाच्या संघाने सादर केलेले 'धोंड्या धोड्या पाणी दे, साय-माय पिकू दे' या अहिराणी गीताच्या सादरीकरणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
युवा महोत्सवात नाट्यगृहातील नाट्यरंग मंचावर सायंकाळच्या वेळी लोक आदिवासी नृत्य कलेचे सादर करण्यात आले. यात देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड मॅनेजमेंटच्या संघाने कोळी नृत्य सादर केले. त्यानंतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय ज्ञान सहायक विज्ञान संस्था यांनीही कला सादर केली. अंबडच्या मत्स्योदरी महाविद्यालयाच्या संघाने 'आली आली काळूबाई हसत खेळत' , डॉ. आंबेडकर विधि महाविद्यालयाच्या संघाने 'कोळीवाड्याचे भार....एकवीरा आई तू डोंगरावरी' अशा लोकगीतांचे सादरीकरण केले. त्याशिवाय इतरही संघांनी सहभाग नाेंदवला.
'सासूबाईच्या नावाने सूनबाई घालते गोंधळ'लोकरंग रंगमंचावर सरस लोकगीतांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. एका संघाने 'सासूबाईच्या नावाने सूनबाई घालते गोंधळ...' या बोलाच्या लोकगीताचे सादरीकरण करताच प्रेक्षकांमधून अनेकांनी ठेका धरला. त्याशिवाय बल्गरी दादा बल्गरी, शिवरात्रीला पडले होते टिपूर चांदणं, काढती शंभूच्या नावाणं गोंदण, राब राब राबते घरात मी, आई राधा उदो उदो...येडेश्वरीचा उदो उदो, सादनंदीचा उदो उदो...एका अनेक लोकगीतांना प्रेक्षकांनी दाद दिली.
ताल, सूर अन् वाद्यांचा संगमनाट्यगृहातील रंगमंचावर एकाहून एक अशा सरस लोकवाद्यांची शहनाई ऐकण्यास मिळाली. विविध संघांनी टाळ, मृदंग, बासरी, पखवाज, हलगी, लेझीम, ढोल, डब इ. वाद्यांचे सादरीकरण केले. त्यासही प्रतिसाद मिळाला.
शाहिरी जलसा- महापुरुषांचा गजरमुख्य सृजनरंग मंचावर दुपारच्या सत्रात जलसा जोरदार रंगला. कलावंतांनी आंबेडकरी जलशाचे सादरीकरण केले. इंडिया म्हणावं की भारत या वादात कोणालाही रस नाही. देशातील नागरिकांना काय हवंय, शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत. त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे सांगत कलावंतांनी महापुरुषांच्या नावाचा गजर केला. या कलाप्रकारात १८ संघांनी सहभाग नोंदवला.
महोत्सवासाठी राबले शेकडो हातकेंद्रीय युवा महोत्सवाच्या यशस्वितेसाठी विविध समित्या, प्राध्यापक, कर्मचारी, ‘कमवा व शिका’ योजनेचे विद्यार्थी अशा तीनशेहून अधिक जणांनी अविरत परिश्रम घेतले. विद्यापीठाच्या मुख्य परिसरात महिनाभरापासून महोत्सवाची तयारी सुरू आहे. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास मंडळाने २० समित्या स्थापन केल्या. या समित्यांचे अध्यक्ष व सदस्य मिळून जवळपास ३१० जण कार्यरत आहेत. यामध्ये व्यासपीठ, पाहुणे निवड, परीक्षक, वेळापत्रक, निवास व भोजन, प्रसिद्धी, निकाल, तक्रार निवारण, ध्वनी-प्रकाश व्यवस्था, बक्षीस वितरण, टेंडर, सुरक्षा आदी समित्यांचा समावेश आहे. डॉ. संजय पाटील देवळाणकर, डॉ. दासू वैद्य, प्रा. संभाजी भोसले, डॉ. शिरीष अंबेकर, डॉ. योगिता होके पाटील, दत्तात्रय भांगे, डॉ. जयंत शेवतेकर, डॉ. सोनाली क्षीरसागर, डॉ. संजय शिंदे, बाळू इंगळे आदी समित्यांचे अध्यक्ष आहेत. तर, विद्यार्थी विकास विभागातील हरिश्चंद्र साठे, गजानन पालकर, अनिल केदारे, बाळासाहेब जाधव आदींसह ‘कमवा व शिका’ योजनेच्या ११० विद्यार्थ्यांचा समावेश होता. तसेच, विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील जवळपास १० प्राध्यापकांचा यात समावेश आहे.