वैजापूर : शासकीय निवासी वसतिगृहातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या एका कोरोनाबाधित रुग्णाने रविवारी सकाळीच सामानासह धूम ठोकली. आठ तास उलटूनदेखील प्रशासनाला संबंधित रुग्णाचा थांगपत्ता न लागल्याने कोरोना संक्रमणाचा धोका वाढला आहे.
तालुक्यातील जानेफळ येथील हा बाधित रुग्ण आहे. तो सध्या औरंगाबाद शहरात वास्तव्यास आहे. गावाकडे आल्यानंतर त्याला कोरोना संसर्गाची बाधा झाल्याने त्याला उपचाराकरिता शासकीय निवासी वसतिगृहातील कोविड केंद्रात भरती करण्यात आले होते. दरम्यान, या केंद्रात जेवणाची व्यवस्था चांगली नाही. याआधीदेखील बाधित रुग्णांकडून तक्रारी केल्या गेल्या होत्या. त्यात संबंधित पलायन केलेल्या रुग्णानेदेखील प्रशासनाकडे जेवणासंबंधी तक्रार केली होती. मात्र, त्यात बदल होत नसल्याने वैतागलेल्या रुग्णाने कोविड सेंटरच्या सुरक्षा भिंतींवरून सामानासह उडी घेऊन पलायन केले. परिसरातील शेतातून जाताना संबंधित बाधित रुग्णाला काही नागरिकांनी पाहिले. त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा केंद्रात जेवणाची व्यवस्था नाही. घरी जातोय असे सांगून तो घराकडे निघून गेला.
अन् प्रशासनाकडून सुरू झाली धावपळ
सुविधा मिळत नसल्यामुळेच संबंधितांना कळवूनही ते लक्ष देत नाहीत, त्यामुळे संतापलेला हा युवक सेंटरमधून फरार झाला. मात्र, आठ तास उलटूनही सेंटरमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ही बाब कळली कशी नाही. उशिरा ही बाब उघडकीस आल्यानंतर प्रशासनाची धावपळ उडाली. या रुग्णास शोधून सेंटरमध्ये आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. मात्र, हा रुग्ण शोधून परत आणणे हे जिकिरीचे काम आहे.