लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय आयोजित राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत धुळे येथील अण्णासाहेब दत्तात्रय महाविद्यालयाने स. भु. सुवर्ण करंडक जिंकला.संस्थेच्या गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमीत घेण्यात आलेल्या वादविवाद स्पर्धेत ३५ महाविद्यालयांचे संघ सहभागी झाले होते. ‘शेतीची उपेक्षा शेतकºयांच्या असंतोषाचे कारण आहे’ या विषयावर स्पर्धा घेण्यात आली. यात अण्णासाहेब दत्तात्रय महाविद्यालयाच्या निकिता पाटील व जितेंद्र पवार या दोघांनी उत्कृष्टपणे परखड विचार मांडून सुवर्ण करंडक आपल्या नावावर केला. अकोला येथील शिवाजी महाविद्यालयाचे प्रतीक महल्ले व अक्षय राऊत यांना रौप्य करंडक (द्वितीय), तर अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाचे उत्कर्षा पाटील व श्रुती देशमुख यांनी ताम्र करंडक (तृतीय क्रमांक) पटकावला. स्वामी रामानंद तीर्थ संशोधन केंद्राचे अध्यक्ष डॉ. एस. बी. वराडे, स.भु. महाविद्यालयाचे प्राचार्य जगदीशचंद्र खैरनार, उपप्राचार्य सोमाजी ठोंबरे, मकरंद पैठणकर यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. प्रारंभी, स्पर्धेचे अहवाल वाचन प्रा. ऋषिकेश कांबळे यांनी केले. यापुढे राष्ट्रीय पातळीवरील इंग्रजी भाषेतून वादविवाद स्पर्धा घेण्यात येणार असल्याची घोषणा प्राचार्य खैरनार यांनी केली. श्रीकांत उमरीकर, मंजूषा नळगीरकर व अनिल सांगळे हे परीक्षक होते. सूत्रसंचालन नाट्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. किशोर शिरसाट यांनी केले.
‘धुळ्या’ने जिंकला स.भु. सुवर्ण करंडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 1:02 AM