औरंगाबाद : सर्व जण ज्याची आतुरतेने प्रतीक्षा करीत आहे तो नवरात्रोत्सव अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपला आहे. पहिल्याच दिवसापासून यंदा दांडिया, गरबाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा तरुणी धूमधडाका घागरा, लहान मुली ‘चुन्नूमुन्नू’ घागरा परिधान करून तर, केडिया ड्रेस व खास डब्बल कोल्हापुरी फेटा अशा रुबाबात तरुण दांडिया खेळताना दिसून येतील. गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवातही निर्बंधमुक्त आहेत. त्यामुळे दांडिया खेळण्यासाठी औरंगाबादकर तयारीला लागले आहे. याची प्रचिती घागरा, केडिया हे गरबा, दांडियासाठी वापरण्यात येणाऱ्या पारंपरिक पोशाखाचे व्यापाऱ्यांकडे सुरू झालेल्या बुकिंगवरून येत आहे.
व्यापाऱ्यांनीही खास गुजरातहून यंदा विविध डिझाईनमधील फ्रेश घागरा व केडिया ड्रेस आणले आहेत. बाजारात पहिली खेप आली आहे. यंदा धूमधडाका घागरा तरुणींमध्ये प्रिय होईल. याची वैशिष्ट्ये म्हणजे डिझायनरने तीन घागरे एकत्र करून धूमधडाका घागरा बनविला आहे. चार बाजूने हा घागरा वेगवेगळ्या रंगात दिसतो. लहान मुलींमध्ये ‘चुन्नुमून्नू’ घागरा आकर्षण ठरत आहे. तरुणींसाठी नऊ मीटर घेरा असलेला घागरा बाजारात आणण्यात आला आहे. कमी वजनाचा, जास्त वर्क नसलेला घागरा पसंत केला जात आहे. याशिवाय ऑल ओव्हर घागऱ्यावरील गामठी प्रिंटही वैशिष्ट्यपूर्ण आहे. तरुणांसाठी डबल कोल्हापुरी फेटा बाजारात आला आहे. ३ फुटांचा फेटा व त्यावर १५ इंची तुरा लावून दांडिया खेळताना तरुण दिसतील.
दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा दांडियाचे आयोजन होत असल्याने तरुण-तरुणींमध्ये मोठा उत्साह पाहण्यास मिळत आहे. पहिल्या चार दिवसांच्या घागऱ्याची बुकिंग झाली असल्याची माहिती घागरा डिझायनर नीलेश मालाणी यांनी दिली.जीन्स, टीशर्ट, जॉकेट, ओढणी अनेक तरुणी पारंपरिक ड्रेसिंगऐवजी इंडो-वेस्टर्न ड्रेसिंगला प्राधान्य देतात. त्यांच्यासाठी जीन्स, टीशर्ट, जॉकेट व त्यावर ओढणी असा यंदाचा ट्रेंड पाहण्यास मिळणार आहे. बेरिंगसोबत लाइटिंगच्या दांडिया यंदा अनेक तरुण दांडिया बोटाभोवती फिरविताना दिसतील. याच त्या बेरिंगला जोडलेल्या व लाइटिंग असलेल्या दांडिया होय. याशिवाय संखेडा दांडिया, विविध ड्रेसवर मॅचिंग होतील अशा ॲल्युमिनियम मिरर कट दांडियाही बाजारात दाखल झाल्या आहेत.