औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) पॅथॉलॉजी विभागाला ७९ लाख रुपयांचे अत्याधुनिक आणि स्वयंचलित ‘लिक्विड बेस्ड सायटोलॉजी’ यंत्र प्राप्त झाले आहे. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या तपासणीच्या अहवालासाठी पूर्वी एक ते दोन दिवस लागत; परंतु या नव्या यंत्रामुळे यापुढे तासाभरात अचूक अहवाल प्राप्त होणार आहे.
पॅथॉलॉजी विभागातर्फे रविवारी (दि. ७) ‘रोल आॅफ लिक्विड बेस्ड सायटोलॉजी इन सर्व्हाकल कॅन्सर स्क्रीनिंग’ या विषयावर ‘सीएमई’ घेण्यात आली. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या हस्ते ‘सीएमई’चे उद््घाटन झाले. यावेळी ‘लिक्विड बेस्ड सायटोलॉजी’ या यंत्राचेही उद््घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी उपअधिष्ठाता आणि पॅथॉलॉजी विभागप्रमुख डॉ. राजन बिंदू, डॉ. एस. के. टी. जैन, डॉ. चंद्रकांत थोरात, डॉ. अनुपमा गुप्ता, ‘सीएमई’चे आयोजन सचिव डॉ. अनिल जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. अतुल भालेराव, डॉ. डी. एम. भट, डॉ. एम. ए. पांगरकर, डॉ. एस. पी. नायक, डॉ. भारत सोनवणे, डॉ. श्रीनिवास गडप्पा, डॉ. सरोजिनी जाधव, डॉ. मंजू ढवळे, डॉ. सुनीता पाटील, डॉ. प्रगती फुलगिरकर, डॉ. शुभज्योती पोरे, डॉ. शाजिया अंजूम आदी उपस्थित होते.
उद््घाटनप्रसंगी डॉ. येळीकर म्हणाल्या, यंत्र प्राप्त झाल्यानंतर त्याच्या देखभालीचा मुद्दा महत्त्वाचा असतो. त्यामुळे यंत्रांचा योग्य आणि प्रशिक्षित तज्ज्ञांकडून वापर झाला पाहिजे. संशोधनासाठीही प्राधान्य दिले जावे, असे त्या म्हणाल्या. यावेळी ‘सीएमई’मध्ये विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
किडनी बायोप्सीसाठी प्रयत्नघाटी रुग्णालयास प्राप्त झालेले हे राज्यभरातील पाचवे यंत्र आहे. सध्याच्या यंत्राच्या तुलनेत ते आधुनिक व स्वयंचलित आहे. त्याद्वारे प्राप्त होणारा अहवालदेखील अधिक अचूक असतो. गर्भाशयाच्या कर्करोगाचे लवकर निदान होण्यास मदत होते. किडनी बायोप्सीसाठीदेखील प्रयत्नशील आहोत, असे डॉ. राजन बिंदू यांनी सांगितले.