संतोष भिसे, हिंगोलीमागील तीन वर्षांपासून हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील डायलेसिस सेवा उपलब्ध झाल्याने, जिल्हाभरातील किडनीग्रस्तांची बाहेरगावची वारी चुकली असून, वर्षभरात १ हजार ३६१ किडनीग्रस्त असलेल्या रुग्णांना नाममात्र शुल्कात लाभ झाला आहे. जिल्ह्यात पाच हजारच्या वर रुग्ण किडनीच्या आजाराने ग्रस्त असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच हा अजाार जडलेल्यांनी प्राण गमावल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सामान्य जनतेत या आजारासंदर्भात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच किडनीच्या आजारावरील उपचार पद्धतीसुद्धा महागडी असल्याने, किडनीग्रस्त व्यक्तीस मृत्यूला कवटाळल्याशिवाय पर्यायच नाही. परंतु ही भीती आता पूर्णत: कमी झालेली आहे. जिल्हा रुग्णालयात २२ जानेवारी २०१४ मध्ये डायलेसीस सेंटर सुरू करण्यात आल्याने अनेकांना जीवदान तर मिळाले. एवढेच नव्हे तर किडनीग्रस्तांची डायलेसीस करण्यासाठी जिल्ह्याबाहेर जाण्याची फेरी टळली आहे. किडनी निकामी झालेल्या रुग्णांना हिंगोलीतच डायलेसिस सेवेचा लाभ मिळाल्याने आठवड्यातून दोनदा डायलेसिस करणे अगदी सोपे झाले आहे. ही सेवा जिल्ह्यातच उपलब्ध झाल्याने, किडनीग्रस्तांना एक प्रकारची संजीवनीच मिळाली आहे. डायलेसीस विभागात डॉ. संतोष दुर्गकर (किडनीतज्ञ), डॉ. अशोक गिरी, डॉ. अलोक गट्टू, अधिपरिचारिका रत्ना बोरा, दराडे, कपाटे तर डायलेसीस तंत्रज्ञ वाय.आर.पठाण, ए. एस. कदम, एस.एन.गिरी व सेवक खडसे हे रुग्णांना सेवा देत आहेत. किडनीग्रस्तांना आठवड्यातून दोन वेळेस डायलेसीस करणे गरजेचे असल्याने खाजगी रुग्णालयात मात्र तीन ते साडेतीन हजार रुपये मोजावे लागतात. हीच सेवा जिल्हा सामान्य रुग्णालयात अगदी नाममात्र शुल्कात उपलब्ध झाल्याने, त्याचा रुग्णांना चांगलाच उपयोग होत आहे. पूर्वी या सेवेचा लाभ घेण्यासाठी १५० रुपये मोजावे लागत होते. परंतु १ जानेवारीपासून शासन निर्णयाप्रमाणे या सेवेत २५ टक्क्यांनी वाढ झाली असून, सेवेचा लाभ घेण्यासाठी आता २२० रुपये मोजावे लागत आहेत. तर राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतील रुग्णांना एकही रुपयाचा खर्च करण्याची गरज नाही. पुर्वी जिल्ह्यातील किडनीग्रस्त रुग्णांना नांदेड, परभणी, औरंगाबाद, अकोला, शिर्डी या ठिकाणी जावे लागत होते. परंतु आता ती वेळ टळली असली तरी जिल्हा रुग्णालयातच किडनीग्रस्तांचा डायलेसीस करण्याकडे कल वाढला आहे.
१३६१ किडनीग्रस्तांचे वर्षभरात डायलेसिस
By admin | Published: January 31, 2016 11:35 PM