- समीर पठाण जायकवाडी ( छत्रपती संभाजीनगर) : जीवनात काहीतरी करायचे असेल तर जिद्द, चिकटी आणि मेहनत हवी असते. या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास यश नक्कीच मिळते, हे अक्षय रमेश सूर्यवंशी याने दाखवून दिले आहे. मोलमजुरी करणाऱ्या आई-वडीलांच्या कष्टाची जाणीव ठेवत अक्षयने देशभरात नाव कमावले आहे. नामवंत प्रो कब्बडी स्पर्धेत अक्षयने स्थान मिळविले आहे. यूपी योद्धा संघात त्याचा समावेश झाला असून तब्बल बारा लाख ९० हजार रुपयांची बोली लागली होती.
पैठण तालुक्यातील संत एकनाथ सहकारी साखर कारखाना येथे गीतांजली नगर आहे. येथेच अक्षय रमेश सूर्यवंशी (वय २३) हा आई-वाडीलांसोबत राहतो. आई-वडील दोघेही मोलमजुरी करतात. लहानपणापासून कब्बडीची आवड असलेल्या अक्षयने भीमाशंकर विद्यालय येथून तयारी सुरू केली. हलाखीची परिस्थिती असल्याने छत्रपती संभाजीनगर येथे हमाली, केटरर्सचे काम केले. सोबतच कब्बडीचा सराव सुरूच ठेवला.
यातूनच दि.१६ शुक्रवारी रोजी मुंबई येथे प्रो-कब्बडी लिग सीजन-११ ऑक्शन सोहळा पार पडला. यामध्ये लेफ्ट रायडर म्हणून प्रचलित असलेल्या अक्षय यास युपी योद्धा या संघाने १२ लाख ९० हजार रूपयांची बोली लावत खरेदी केले. या यशामागे आई वडील, प्रशिक्षक स्वप्नील गव्हाणे, बाबुराव तांदरे, निलेश गायकवाड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असल्याचे अक्षयने सांगितले.
अक्षयची राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत मजल...अक्षय ने आतापर्यंत महाराष्ट्र राज्य कबड्डी अजिंक्यपद निवड चाचणीमध्ये प्रथम पारितोषिक पटकावले. तसेच तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, विभागस्तरीय मध्ये सुद्धा खेळाला आहे.
भारतीय संघात खेळण्याचे स्वप्न...अक्षय याच्या कुटुंबांमध्ये आई, वडील, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. प्रो कब्बडीमध्ये चांगला खेळ खेळून भारतीय संघाकडून कब्बडी खेळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अक्षयने लोकमत ला बोलताना सांगितले.
पोराने कष्टाचे चीज केले...मी कंपनीमध्ये काम करत असताना सायंकाळी ५ वाजता मुलाला युपी योद्धा या संघाने खेळविण्यासाठी समाविष्ट केल्याचे समजले. हलाखीची परिस्थिती असताना मुलगा इथपर्यंत जाऊ शकला याचा आनंद असून, पोराने कष्टाचे चीज केले असे वडील रमेश सूर्यवंशी यांनी सांगितले.