छत्रपती संभाजीनगर : सामान्यांसोबत होणारी गुंडगिरी, लूटमार आता पोलिसांच्याही मुळावर उठत आहे. हर्सूलमध्ये एका पोलिसावर हल्ल्याची घटना ताजी असतानाच स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार दीपेश रमेश नागझरे (४३, रा. गणेशनगर, हडको) यांना ६ ते ७ जणांनी अडवून मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यांच्याकडील पोलिसाचे शासकीय ओळखपत्र, दीड तोळ्याची अंगठी, रोख ३५ हजार, एटीएम कार्ड हिसकावून घेतले. बुधवारी मध्यरात्री १२.३० वाजता नगरनाका ते बाबा पेट्रोलपंप चौकादरम्यान ही घटना घडली.
नागझरे स्थानिक गुन्हे शाखेत अंमलदार आहेत. १५ मे रोजी सायंकाळी ते शासकीय कामानिमित्त पडेगाव परिसरात गेले होते. तेथून त्यांच्या खासगी कारने शहरात परतत असताना नगर नाक्याजवळ उलट दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वारांची व त्यांच्या कारची किरकोळ धडक झाली. नागझरे यांनी उतरून त्यांना सावरून विचारपूसदेखील केली. त्यानंतर दुचाकीचालक निघून गेले. मात्र, काही वेळातच सहा ते सात दुचाकीस्वारांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. आयकर विभागाच्या अलीकडे त्यांची कार अडवून त्यांना बाहेर ओढले. काहीही न विचारता अचानक हातचापटाने त्यांना मारहाण सुरू केली. नागझरे यांनी त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. गुंडांपैकी काहींनी मात्र कारमधील डॅशबोर्डजवळ ठेवलेले ३५ हजार रोख, अंगठी व ओळखपत्रे हिसकावून घेतले.
पोलिस असल्याचे सांगितले तरीही....शहरात गेल्या पाच महिन्यांमध्ये सर्वत्र लूटमारीच्या घटनांमध्ये विक्रमी वाढ झाली. किरकोळ कारणातून शस्त्रे उपसून हल्ला करण्याचे घटनाही सातत्याने घडत आहेत. सामान्यांवर होणाऱ्या गुंडगिरीचा अनुभव आता पोलिसांच्याही वाट्याला येत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे. नागझरे यांनी गुंडांना ते पोलिस असल्याचे सांगितले. तरीही गुंडांनी मारहाण थांबवली नाही. त्यांच्या डोळ्यावर बुक्क्याने मारून पोलिसाचे ओळखपत्र हिसकावून शेजारील नाल्यात फेकल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश वाघ यांनी शहरातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. छावणी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक सोपान नराळे अधिक तपास करत आहेत.