छत्रपती संभाजीनगर : भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता महाडीबीटी पोर्टल सुरू झाले आहे. विद्यार्थ्यांनी या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर संबंधित महाविद्यालयांनी अर्जांची पडताळणी करुन परिपूर्ण अर्ज ३० नोव्हेंबरपर्यंत समाज कल्याण कार्यालयाकडे सादर करायचे आहेत.
यासंदर्भात समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त पी.जी. वाबळे यांनी कळविले की, दरवर्षाप्रमाणे २०२३- २४ या चालू शैक्षणिक वर्षात भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवर नवीन आणि नूतनीकरण ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत असून त्यासाठी ११ ऑक्टोबरपासून हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत निर्वाह भत्ता, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतीपूर्ती योजना व इतर शुल्क विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असावे. या शिष्यवृत्तीसाठी अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्गातील लवकरात लवकर ऑनलाइन अर्ज भरावेत. या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून अर्जदार विद्यार्थी घरी बसून आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपच्या सहाय्याने अर्ज भरु शकतो. ज्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.
विद्यार्थ्यांनी ऑनलाइन भरलेल्या अर्जांची पडताळणी महाविद्यालयांनी विहित कालावधीत करावी व त्रुटींची पुर्तता करून घेणे बंधनकारक आहे. अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांपैकी कोणी शिष्यवृत्तीपासून वंचीत राहिल्यास त्याची सर्व जबाबदारी ही संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांवर राहिल, असे समाज कल्याण विभागाने कळविले आहे.
गत वर्षी ६७ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभगेल्या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या ३० हजार १०१ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना, तर विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्गातील १५३ विद्यार्थी अशा एकूण ६७ हजार २५४ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्ती जमा करण्यात आली.
अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रेशिष्यवृत्ती अर्जासोबत विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, रहिवाशी दाखला, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, पासपोर्ट आकाराचे फोटो, उत्पन्न प्रमाणपत्र, मागील वर्षाची गुणपत्रिका आदी कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.