औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची धडक मोहीम राबवून प्रशासनाने २५ दिवसांत पहिल्या डोसचे प्रमाण ५४ टक्क्यांवरून ७९ टक्क्यांवर आणले. दुसऱ्या डोसचे प्रमाण अजूनही वाढत नसल्याने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आता दुसरा डाेस घेण्यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे. पहिला डोस घेऊन ८५ दिवसांची मुदत संपणाऱ्यांना मोबाइलवरून संपर्क साधून लस घेण्याचे आवाहन केले जात आहे. दुसरा डोस न घेतलेल्यांची संख्या ३ लाखांवर आहे.
राज्यात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा प्रवेश झाल्याने जिल्हा प्रशासनाने लसीकरण वाढविण्यावर भर दिला. जिल्ह्यात ९ नोव्हेंबरपासून लसीकरणाची मोहीम हाती घेतली. गेल्या आठवड्यात लसीकरणाचा टक्का खाली गेल्याने प्रशासनाने चिंता व्यक्त केली. पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण शंभर टक्के करण्याचे तर ८५ दिवस पूर्ण झालेल्यांना दुसरा डोस घेणाऱ्यांचे लक्ष्यपूर्ती करण्याचे प्रशासनासमोर आव्हान आहे.
दुसरा डोस देण्याचे लक्ष्यजिल्ह्यात तीन आठवड्यांपूर्वी पहिल्या डोसचे लसीकरण ५४ टक्के तर दुसऱ्या डोसचे प्रमाण २४ टक्क्यांवरच होते. प्रशासनाच्या मोहिमेनंतर पहिल्या डोसचे प्रमाण ७९ टक्क्यांवर गेले. दुसरा डोस घेणाऱ्यांची टक्केवारी ३५.१४ टक्केच आहे. प्रत्यक्षात ही टक्केवारी ५० टक्क्यांवर येणे अपेक्षित होती. ग्रामीणमधील पावणेदोन लाख तर शहरातील सव्वा लाख अशा ३ लाखांहून अधिक नागरिकांनी ८५ दिवसांची मुदत संपूनही दुसरा डोस घेतला नाही. या नागरिकांना दुसरा डोस देण्याचे लक्ष्य पुढील काळात आहे.