छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर लोकसभेची उमेदवारी आपण पक्षाकडे मागितली नाही, पण पक्षाने दिल्यास निवडणूक लढेन अशी आपली भूमिका असल्याचे विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली.
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघावर शिवसेनेकडून माजी खासदार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे दावा सांगत आहेत. एवढेच नव्हे तर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही या मतदार संघावर हक्क सांगितला जात आहे. यापार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना आ. दानवे म्हणाले की, लोकसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. यामुळे २९ किंवा ३० डिसेंबर रोजी दिल्लीत जागा वाटपाचा फाॅर्म्युला ठरण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून कोण उमेदवार असेल, याविषयी काही ठरले का, या प्रश्नाचे उत्तर देताना दानवे म्हणाले की, पक्षाने अद्याप कोण उमेदवार असेल हे निश्चित केले नाही. आपणही पक्षाकडे उमेदवारी मागितली नाही. पण पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढेन.
असे असेल संभाव्य जागा वाटप शिवसेना २०,काँग्रेस १६ तर राष्ट्रवादीला १० आणि अन्य २ असे जागावाटपाचे सुत्र. महाविकास आघाडीकडून अद्याप लोकसभेच्या जागा वाटप करण्यात आले नाही.असे असले तरी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना २०, काँग्रेस १६,राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) १० आणि वंचीत बहुजन आघाडीला १ , राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाला १ असे जागा वाटप शिवसेनेकडून प्रस्तावित करण्यात आल्याचे वरिष्ठ सुत्रांनी सांगितले.मात्र हे जागा वाटप काँग्रेस पक्ष मान्य करण्याची शक्यता नसल्याचे दिसून येते.