संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कोरोना प्रादुर्भावाच्या संकटात एसटी महामंडळाच्या उत्पन्नात घट झाली. परिणामी, कधी डिझेल तर कधी ऑइलचा आगारांमध्ये ठणठणाट होतो आहे. त्यामुळे अन्य आगारांतून डिझेल घेण्याची अथवा बसगाड्या आगारांतच उभ्या करण्याची वेळ येत आहे.
मध्यवर्ती बसस्थानक आगारातील पंपाचे डिझेल संपल्याने १२ जुलै रोजी अनेक मार्गांवरील बस आगारातच उभ्या राहिल्या. आठवडाभरापूर्वी, ७ ऑगस्ट रोजी सिडको बसस्थानकाच्या आगारातील डिझेल संपल्याने काही मार्गांवरील बसच्या फेऱ्या रद्द करण्याची वेळ आली. मध्यवर्ती बसस्थानकाच्या आगारातील पंपातून डिझेल भरून बस रवाना करण्यात आल्या. ही काही एखाद, दोन दिवसांची स्थिती नाही, तर हा प्रकार वारंवार होत आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक दिवस ठप्प झालेली बससेवा पूर्वपदावर आली. मात्र, प्रवाशांची संख्या घटल्याने उत्पन्नावर परिणाम झाला. त्यामुळे डिझेल, ऑइलसह एसटीच्या देखभाल-दुरुस्तीसाठी आवश्यक साहित्यांचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. डिझेलसाठी रक्कमेची जुळवाजुळव करण्याची वेळ येत आहे. त्यामुळे डिझेल येण्यासाठी दोन-दोन दिवस लागतात. परिणामी, बसफेऱ्या रद्द करण्याचीही वेळ ओढावत आहे.
इतर आगारांना, विभागांना डिझेल बंद
एसटी महामंडळाच्या जिल्ह्यातील आगारांकडून दुसऱ्या आगारांतील, विभागांतील बसगाड्यांना डिझेल देणे बंद केले आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी केवळ अत्यावश्यक प्रसंगीच डिझेल दिले जाते, असे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
------
सध्या डिझेलची अडचण नाही
सध्या डिझेलची कोणतीही अडचण नाही. ग्रामीण भागातून बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. बऱ्याच शाळा बंद आहे. त्यामुळे काही बस आगारातच उभ्या राहतात. औरंगाबाद विभागाचे सध्या रोजचे उत्पन्न ३८ लाखांवर आले आहे.
- अमोल अहिरे, विभागीय वाहतूक अधिकारी
----
१७२ बस आगारातच
एसटी महामंडळाच्या ५६० पैकी ३८८ बस धावत आहेत. त्यामुळे १७२ बस आगारातच उभ्या आहेत. प्रवाशांच्या गर्दीनुसार बस सोडण्यात येतात. गर्दी नसेल तर त्या मार्गावर बस सोडण्यात येत नाही, असे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
------
जिल्ह्यातील कोरोनाकाळातील तोटा
एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागाचे रोजचे उत्पन्न हे साधारण ५० लाख रुपये आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी लाॅकडाऊन होते. जवळपास २२३ दिवस बससेवेवर परिणाम झाला. यातून १११ कोटींचे नुकसान झाले. यावर्षीही दुसऱ्या लाटेमुळे निर्बंध होते. तब्बल ४५ दिवस बससेवेला फटका बसला. यातून २२ कोटींचे नुकसान झाले. कोरोना काळाच्या १४ महिन्यांत औरंगाबाद विभागाला १३३ कोटींच्या उत्पन्नांवर पाणी सोडावे लागले.