छत्रपती संभाजीनगर : खासगी आणि एसटी महामंडळाच्या पेट्रोलपंपावर आता एकसमान दरात डिझेल मिळू लागले आहे. त्यामुळे खासगी पंपांवर डिझेल भरण्यासाठी जाणारा वेळ आता वाचणार आहे. याशिवाय खासगी व महामंडळाच्या पेट्रोलपंपावर मिळणाऱ्या डिझेलच्या दरातील एकसमानता महामंडळाला देखील पूरक ठरणार आहे.
एसटी महामंडळाच्या जिल्ह्यातील आठही आगारांमध्ये डिझेल पंप आहेत. ऐन प्रवासात खासगी पंपांवर डिझेल भरण्याची वेळ येऊ नये आणि प्रवाशांचा वेळ वाचावा, यासाठी आगारातील पंप फायदेशीर ठरत आहेत. परंतु वर्षभरापूर्वी डिझेल टँकर मागविताना किरकोळ विक्रीपेक्षा अधिक रक्कम मोजण्याची वेळ महामंडळावर आली होती. म्हणून महामंडळाने त्यांच्या एसटींमध्ये खासगी पंपावरून डिझेल भरण्यास सुरुवात केली होती. कालांतराने इंधन कंपन्यांनी घाऊक डिझेल विक्रीचे दर कमी केले. तब्बल वर्षभरानंतर ह्या किरकोळ विक्रीच्या जवळपास दर आल्याने २ एप्रिलपासून सिडको आणि मध्यवर्ती बसस्थानकातील डिझेल पंप सुरू झाले आहेत.