औरंगाबाद : डिझेलच्या दरवाढीने हैराण झालेल्या मालवाहतूकदारांनी जुलै महिन्यात चक्काजाम आंदोलन करीत तब्बल आठ दिवस संप पाळला. मात्र, तरीही डिझेल दरात घट होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढच होत आहे. परिणामी आगामी काही दिवसांत मालवाहतुकीत १० ते १२ टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगाने वाढत आहेत. पेट्रोल, डिझेलच्या दरात सोमवारी १७ पैसे वाढ झाली. यामुळे शहरात पेट्रोल ८६.५७ व डिझेल ७५.०१ रु पये प्रतिलिटरवर गेले. पेट्रोल-डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेबरोबर जोडण्यात आले आहेत. त्यामुळे दरात सतत बदल होत आहे. डिझेल दरवाढीविरोधात आणि अन्य मागण्यांसाठी २० जुलै रोजी देशभरात मालवाहतूकदारांनी चक्का जाम आंदोलन पुकारले. तब्बल आठ दिवस हा संप चालल्याने उद्योगांची मालवाहतूक ठप्प झाली होती. कें द्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर वाहतूक दारांनी २७ जुलै रोजी संप मागे घेतला.
२० जुलै रोजी डिझेलचे दर ७३.५० रुपये प्रतिलिटर होते. या संपानंतर त्यात घट होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली; परंतु इंधन दरात वाढ सुरूच आहे. यामुळे मालवाहतूकदारांना महागाईची झळ सहन करावी लागत आहे. डिझेलचे दर वाढत असले तरी त्या तुलनेत मालवाहतुकीच्या दरामध्ये सतत वाढ करता येत नाही. वाहनांचे सुटे भाग, देखभाल दुरुस्ती, चालकांच्या वेतनावर होणाऱ्या खर्चासह डिझेलवरील खर्च वाढत आहे.
सर्वसामान्यांना फटकाशहरात दररोज अडीच हजारांपेक्षा जास्त ट्रक येतात व तीन लाख लिटर डिझेलची विक्री होते. महिनाभरात डिझेल दोन ते अडीच रुपयांनी वाढल्याने व्यावसायिकांवरील ताण वाढत असल्याने आगामी काही दिवसांत मालवाहतुकीच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही वाढ झाली तर सर्वसामान्यांना त्याचा फटका बसू शकतो.
आठ महिन्यांत दहा रुपयांची वाढडिझेलचा समावेश जीएसटीमध्ये करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले; परंतु अद्यापही जीएसटीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. गेल्या आठ महिन्यांत जवळपास दहा रुपयांनी डिझेलच्या दरात वाढ झाली. गेल्या महिनाभरातच ३ रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे मालवाहतूक १० ते १२ टक्क्यांनी वाढू शकते. डिझेल दरवाढीसंदर्भात पुढील आंदोलनाची दिशा वरिष्ठ पातळीवर निश्चित केली जाईल.- फय्याज खान, अध्यक्ष,औरंगाबाद गुडस् ट्रान्स्पोर्ट असोसिएशन