औरंगाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील तडवळे गावानजीक एका ई कॉमर्स कंपनीचा माल घेऊन औरंगाबादमार्गे दिल्लीकडे निघालेल्या कंटेनरला अपघात झाला होता. त्यावेळी, स्थानिकांनी कंटेनरमधील वस्तू घरी नेण्यासाठी तोबा गर्दी केली होती. त्यानंतर, आता औरंगाबादजवळ एका डिझेल वाहतूक करणाऱ्या टँकरला अपघात झाला. त्यावेळी, स्थानिकांनी डिझेल घरी नेण्यासाठी गर्दी केली होती. मात्र, स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, नागरिकांना रोखले.
औरंगाबादच्या (Aurangabad) वैजापूर तालुक्यातील करंजगावजवळ एक डिझेलचा टँकर पलटी झाला. टँकर पलटी झाल्याचं गावात समजताच, गावकऱ्यांनी हातात जे मिळेल ते घेऊन टँकरकडे धाव घेतली. त्यानंतर, डिझेल पळवण्याचा खेळ सुरू झाला. विशेष म्हणजे एका पठ्ठ्याने 200 लिटरचं टिपाड घेऊन डिझेल नेण्याची तयारी केली होती. मात्र, बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरल्यामुळे पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, लोकांना डिझेल चोरी करण्यापासून अडविण्यात आले.
देशात पेट्रोल आणि डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले असून पेट्रोलने शंभरी पार केली आहे. तर, डिझेलचीही शंभरीकडे वाटचाल आहे. त्यामुळेच, डिझेलच्या टँकरला अपघात झाल्याचे समजताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली, मिळेल त्या भांड्यात डिझेल पळविण्याची जणू स्पर्धाच लागली होती. आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मुंबई-नागपूर हायवेवर डिझेलने भरलेला टँकर जालना जिल्ह्याकडे जात होता. त्यावेळी औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील करंजगावजवळ डिझेलने भरलेला टँकर रस्त्याच्या खाली जात काटेरी झुडपात पलटी झाला. यात गाडीचा क्लिनर जखमी झाला. ड्रायव्हरलाही थोडासा मार लागला.
उस्मानाबादमध्येही कंटेनर पलटी
या आठवड्यातच एका ई कॉमर्स कंपनीचा माल घेऊन एक कंटेनर बेंगळुरुहून दिल्लीकडे निघाला होता. त्यामध्ये जवळपास ७५ लाख रुपयांचा माल होता. सोलापूर-धुळे मार्गावरुन तो औरंगाबादमार्गे पुढे मार्गस्थ होणार होता. तत्पूर्वीच सोमवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास तेरखेडा (जि.उस्मानाबाद) गावानजिक येताच हा कंटेनर रस्त्याशेजारी उलटला. पेढीवरील लोकांना या अपघाताची माहिती कळताच तेथील सुमारे दीडशेवर लोकांनी याठिकाणी धावा बोलला. कंटेनरमधील माल लुटण्यास सुरुवात केली. ही बाब येरमाळा पोलिसांना कळताच पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास एक पथक घटनास्थळी दाखल झाले अन् माल हस्तगत केला.