औरंगाबाद: देशभरातल्या विविध राज्यात पेट्रोल पंपावरून डिझेल चोरी करणारी आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी केलाय. या टोळीतील तब्बल १४ जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ९८ लाख ४९ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात ३ मोठे ट्रक, डिझेल चोरी करण्यासाठी वापरलेले हॅण्डपंप , डिझेलने भरलेले ४५ कॅन आणि ८ मोबाईलचा समावेश आहे.
१६ फेब्रुवारी रोजी रात्री धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील श्री पेट्रोल पंपावरून जवळपास ४ लाखाच्या डिझेलची चोरी केली होती. याविषयी चिकलठाणा ठाण्यात १७ फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंद झाला होता . त्यांनंतर औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेनी सापळा रचून टोळीला ताब्यात घेतले. अटकेतील टोळीने ५६ पेक्षा अधिक गुन्हे केले आहेत. या टोळीचा प्रमुख राम्या पाना पवार हा उसमनाबाद जिल्ह्यातील तेरखेडा येथील रहिवासी आहे. तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. या टोळीत अनेक जण सहभागी असल्याचं समोर आलंय. वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकचालक मालक हे या टोळीकडून निम्या दराने डिझेल विकत घेत होते. टोळीप्रमुख असलेल्या राम्या पवारवर घरफोडी, दरोडा, लुटमार आणि मारहाणीचे २७ गुन्हे नोंद आहे.