लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महावितरण कंपनी शहरातील २० ते ३५ कि़मी.दरम्यानचे रस्ते खोदून भूमिगत केबलिंग करणार आहे. त्यासाठी कंपनी मनपाला ५० कोटी रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्यावर दोन्ही संस्थांमध्ये निर्णय झाला आहे. शहरात यापूर्वीही रिलायन्स जिओने भूमिगत केबलिंगसाठी रस्त्याच्या बाजूने खोदकाम केले होते. त्यातून पालिकेने कुठलेही रस्ते दुरुस्त न करता तसेच सोडून दिल्यामुळे पूर्ण रस्ते खराब झाले. महावितरण कंपनीकडूनही पालिका नुकसानभरपाई म्हणून रक्कम घेईल आणि दुसरीकडे खर्च करण्याची शक्यता नाकारता येत नाही. २५०० रुपये प्रति मीटरप्रमाणे महावितरण मनपाला रस्ते खोदण्यासाठी परवानगी शुल्क देणार आहे. सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया आणि प्रभारी शहर अभियंता सिकंदर अली, मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्यात भूमिगत केबलिंगसाठी बैठक झाली. साईडड्रेनच्या दिशेने खोदकाम करण्यात येईल, जिथे रोड क्रॉसिंग असेल तेथे रस्ता खोदावा लागणार आहे. आता कुठे शहरातील रस्ते जरा बरे होत आले आहेत, त्यातच पुन्हा साईडड्रेनप्रमाणे रस्ते खोदण्यात येणार आहेत. मनपाला ५० कोटींपर्यंत रक्कम कंपनीने देण्याचे ठरले आहे, असे मुख्य अभियंता गणेशकर यांनी सांगितले.वाळूज महानगर, दूध डेअरी, चिकलठाणा, समाधान कॉलनी, एन-१० हे नवीन सबस्टेशन आयपीडीएस या नवीन योजनेंतर्गत होत असून, त्यातच ३३ केव्हीची २०, तर ११ के.व्ही.ची १५ कि़मी. वीजवाहिनी भूमिगत करण्यात येणार आहे. याशिवाय एलटी वीजवाहिनीदेखील भूमिगत करण्याचा व ७ फिडर नव्याने बसविण्याचा प्रस्ताव योजनेत आहे.
भूमिगत केबलिंगसाठी खोदकाम
By admin | Published: July 14, 2017 12:34 AM