भारत दाढेल।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यात २ हजार ३१ जिल्हा परिषदेच्या डिजिटल शाळा झालेल्या असताना या शाळेतील प्राथमिक शिक्षकांना मात्र बदल्यांचे अर्ज भरण्यासाठी शहरातील नेटकॅफेवर धाव घ्यावी लागली़ केवळ अडीचशे शाळेत इंटरनेटची सुविधा असल्याने डिजिटल शाळांची ही आकडेवारी फुसकाबार ठरला आहे़तंत्रज्ञान आणि आधुनिक शिक्षण प्रणालीची गंगा जिल्हा परिषद शाळांच्या अंगणात आणून त्याचा गवगवा करणाºया शिक्षण विभागाचे पितळ या निमित्ताने उघडे पडले आहे़ शिक्षकांच्या बदलीची नवीन प्रक्रिया तांत्रिक अडचणीमुळे मे पासून प्रलंबित आहे़ संवर्ग १ व २ चे फॉर्म भरणे पूर्ण झाले असून ३ व ४ प्रवर्गातील शिक्षकांसाठी बदली पोर्टल अखेरच्या क्षणी म्हणजे २५ आॅक्टोबर रोजी योग्य पद्धतीने काम करू लागले़ त्यामुळे उर्वरित शिक्षकांनी या दोन दिवसांत आपले आॅनलाईन अर्ज तातडीने पूर्ण केले़ शेवटच्या दिवशी अडीचेश शिक्षकांचे अर्ज शिल्लक राहिले होते़ या शिक्षकांनी सायंकाळपर्यंत अर्ज दाखल केल्याची माहिती आहे़ ऐन दिवाळी सणात शिक्षकांना बदली अर्ज दाखल करण्यासाठी नेट कॅफेत धाव घ्यावी लागली़ शिक्षकांच्या बदलीच्या निमित्ताने डिजिटल शाळांचा प्रश्न मात्र ऐरणीवर आला़ जिल्ह्यातील तब्बल २ हजारांहून अधिक शाळेत आधुनिक तंत्रज्ञानाची सुविधा असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मात्र दीडशे शाळेतच इंटरनेटची सुविधा आहे़ त्यामुळे शिक्षकांना नेटकॅफेत धाव घ्यावी लागली़ हे चित्र प्रशासनाने दिलेल्या डिजिटल शाळेतील आकडेवारीशी विसंगत ठरले आहे़ शाळा डिजिटल असतील तर त्या ठिकाणी शिक्षकांना अर्ज भरण्याची सुविधा का नाही, या शाळा आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण आहेत का, नसतील तर या शाळा डिजिटल कशा, असे प्रश्न निर्माण झाले आहेत़अनेक जिल्हा परिषद शाळेत मोबाईलसमोर मोठा स्क्रिन ठेवून डिजिटल शाळेचे स्वप्न साकार करण्यात आले़ काही शाळेत संगणक आहेत, परंतु इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाही़ काही ठिकाणी इंटरनेट आहे पण त्याला स्पीड नाही़ काही शाळेत संगणक धूळखात आहेत़काही शाळेत प्रोजेक्टरची सुविधा आहे, परंतु या प्रोजेक्टरचा लाभ विद्यार्थ्यांना मिळत नाही़ अशा सर्व परिस्थितीत शिक्षकांच्या बदल्यांना मार्चपासून सुरूवात झाली़ तेव्हापासून बदलीपात्र शिक्षकांना बदलीचे वेध लागले आहेत़ त्यामुळे माहिती आॅनलाईन आणि गुणवत्ता आॅफलाईन असे चित्र पाहण्यास मिळाले़
बदल्यांच्या निमित्ताने डिजिटल शाळांचा फुटला फुगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:35 AM