औरंगाबाद : कोरोना व्हायरसची साथ पसरू नये म्हणून प्रशासनाकडून नाथषष्ठी यात्रा स्थगित करण्याचे आदेश मंगळवारी दुपारी जारी करण्यात आले आहे. मात्र असे असताना सुद्धा अनेक दिंड्या पैठणच्या दिशेने कूच करत असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे दिंडीतील अनेक वारकऱ्यांना नाथषष्ठी यात्रा रद्द झाल्याबाबत माहितीच नसल्याचं सुद्धा समोर आले आहे.
दरवर्षी नाथषष्ठी महोत्सवासाठी राज्याच्या विविध भागातून भाविक वारकरी मोठ्या संख्येने श्री क्षेत्र पैठण येथे येतात. अंदाजे 4 लाखाच्या जवळपास भाविक नाथषष्ठी महोत्सव निमिताने पैठणमध्ये येत असतात. औरंगाबादसह राज्यभरातून अनेक पायी दिंड्या सुद्धा यावेळी पैठणमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात.
मात्र नाथषष्ठी महोत्सव यात्रेमध्ये व जमणाऱ्या जनसमुदाया मध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊन या रोगाचा फैलाव होऊ नये व खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी मंबई पोलीस कायदा 1951 चे कलम 43 अन्वये नाथषष्ठी यात्रेस विशेष उपाययोजना करण्याच्या दृष्टीने स्थगिती दिली आहे. त्यामुळे ४२५ वर्षाच्या इतिहासात यंदा प्रथमच नाथषष्ठी रद्द झाली आहे.
मात्र असे असताना सुद्धा, प्रशासनाकडून हवी तशी जनजागृती केली जात नसल्याने, अनेक दिंड्या पैठणच्या दिशेने रवाना होताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे यात्रा रद्द झाली असल्याच्या माहितीला जास्तीत-जास्त प्रसिद्धी द्यावी असा आदेश जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या पत्रात दिला गेला आहे. परंतु असे होताना दिसत नसल्याने, वारकरी सुद्धा संभ्रमात असल्याचे पाहायला मिळत आहे.
आम्ही गेली 30 ते 35 वर्षांपासून धोत्रा येथील दिंडी घेऊन पैठणला येत असतो. यावेळी सुद्धा आमची दिंडी पैठणला जाणार असून थोडे अंतर शिल्लक राहिले आहे. नाथषष्ठी रद्द झाली असल्याचं आयकल असून, खर काय खोट काय माहित नाही. आम्हाला आतापर्यंत रस्त्यात कुठेच कुणी अधिकारी किंवा व्यक्ती मिळाला नसून ज्यांच्याकडून खात्रीलायक माहिती मिळाली असती. ( बाबू पाटील गोरे, वारकरी )