छत्रपती संभाजीनगर : राँग साइड, विना परवाना, विना परमिट गाणे वाजवत, बेशिस्त, निष्काळजीपणे जाणाऱ्या रिक्षा चालकांच्या संख्येत वाढ झाली. वारंवार दंडात्मक कारवाई करूनही परिणाम होत नसल्याने पोलिसांनी आता कठोर भूमिका घेतली आहे. सिडको चौकात वाहतूक खोळंबा होत असतानाही बेजबाबदारपणे रिक्षा उभी करणाऱ्या चौघांवर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.
सिडको उड्डाणपुलाच्या डागडुजीचे काम सुरू असल्याने, वाहतूक जालना रस्त्यावरून वळविण्यात आली आहे. परिणामी, मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबा होतो. सिडको पोलिस ठाण्याचे डायल ११२ चे कर्मचारी येथे गस्तीसाठी असताना रिक्षा चालकांचा बेशिस्तपणा निदर्शनास आला. त्यांनी भर चौकात रिक्षा उभी केली होती. जावेद चांद मोमीन (रा.यासीननगर), वंशराज पटेल, ज्ञानेश्वर अंबादास राठोड (दोघेही रा.हर्सूल) व पवन श्यामराव राठोड (रा.जटवाडा) यांना रिक्षासह ताब्यात घेत गुन्हे दाखल केले.
सहायक आयुक्त अशोक थोरात, निरीक्षक अमोल देवकर, राजेश मयेकर, सचिन मिरधे यांनी शहरात शनिवारी रिक्षा चालकांविरोधात मोहीम हाती घेतली. ११० रिक्षा चालकांवर कारवाई करून ७९ हजार १५० रुपये दंड ठोठावण्यात आला, तर ३२ रिक्षा जप्त करण्यात आल्या. यापुढे सातत्याने कारवाया सुरू राहतील, असे थोरात यांनी स्पष्ट केले.