औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या उपकरातून अपंगांसाठी राबविण्यात येणाऱ्या सर्वच योजनांचा निधी यापुढे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, नावीन्यपूर्ण व लाभार्थ्यांना फायदेशीर ठरतील, अशा योजना यंदा राबवल्या जातील, अशी माहिती समाजकल्याण अधिकारी सचिन मडावी यांनी दिली. ‘लोकमत’शी बोलताना मडावी म्हणाले की, जिल्हा परिषदेमार्फत अपंगांसाठी काही योजना राबविल्या जातात. जि.प. उपकराच्या निधीतून जवळपास १० योजना राबविल्या जातात. एकूण उपकर निधीच्या ३ टक्के निधी अपंगांच्या उत्थानासाठी खर्च केला जातो. त्यामुळे यंदाच्या आर्थिक वर्षात अपंगांसाठी राबविल्या जाणाऱ्या उपकरातील सर्वच योजनांचा निधी त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा जिल्हा परिषद प्रशासनाने निर्णय घेतला आहे. यामध्ये प्रामुख्याने अजिंठा किंवा वेरूळसारख्या पर्यटनस्थळाच्या ठिकाणी आधुनिक शौचालय उभारण्याचा प्रशासनाचा संकल्प आहे. अजिंठा आणि वेरूळ येथील लेणी पाहण्यासाठी देश-विदेशातून लाखो पर्यटक दरवर्षी येत असतात. या दोन्ही पर्यटनस्थळांच्या ठिकाणी विदेशी पर्यटकांना ‘कमोड’ पद्धतीचे शौचालय उपलब्ध नसल्यामुळे त्यांची गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पर्यटनस्थळाजवळच्या परिसरात अपंग लाभार्थ्यांना सुलभ शौचालयाच्या धर्तीवर ‘कमोड’ पद्धतीचे शौचालय बांधून देण्याची योजना राबवली जाणार आहे. याशिवाय वेरूळ, अजिंठा, खुलताबाद, दौलताबाद या पर्यटनक्षेत्रांच्या ठिकाणी लाभार्थ्यांसाठी दुकानांचे गाळे बांधून देण्याची योजनाही राबवली जाणार आहे. ग्रामपंचायतींकडून भाडेतत्त्वावर जागा घेऊन दुकानांचे गाळे बांधले जातील. अपंगांसाठी झेरॉक्स मशीन, संगणक आदी योजनाही प्रामुख्याने राबवल्या जातील. या योजनांचा निधी संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे. त्यानंतर महिनाभराच्या कालावधीनंतर संबंधित निधीचा उपयोग योजनेसाठीच खर्च झाला किंवा नाही, याची समाजकल्याण विभागामार्फत पडताळणी केली जाईल. अपंगांसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांमध्ये गैरव्यवहार होऊ नये. ही योजना सत्कारणी लागावी, हा यामागचा हेतू असल्याचेही मडावी म्हणाले.
अपंगांच्या खात्यावर थेट निधी जमा करणार
By admin | Published: July 07, 2016 11:46 PM