औरंगाबाद : मुंबई येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत औरंगाबादच्या खेळाडूंनी ५ सुवर्ण व ४ रौप्यपदकांसह एकूण १३ पदकांची लूट केली. त्यात दिशा जोशी, प्रियंका राठोड, जागृती सोनुले आणि श्रेयस लेंभे याने सुवर्णपदकांची कमाई केली. सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची नवी दिल्ली येथे २0 ते २२ एप्रिलदरम्यान होणाºया राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.मुलांच्या १२ वर्षांखालील कुमिते प्रकारात श्रेयस लेंभेने सुवर्णपदक आणि काता प्रकारात कास्य जिंकले. दिशा जोशी हिने मुलींच्या १६ वर्षांखालील गटातील कुमिते प्रकारात ४१ किलो वजन गटात सुवर्णपदक जिंकले. मात्र, काता प्रकारात तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. १२ वर्षांखालील मुलींमध्ये प्रियंका राठोडने दुहेरी यश मिळवले. तिने कुमिते आणि काता दोन्ही प्रकारांत ४० किलो वजन गटात सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. जागृती सोनुलेने ३५ किलो वजन गटात कुमिते प्रकारात सुवर्ण आणि काता प्रकारात रौप्यपदक पटकावले. यशस्वी खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक सुरेश मिरकर यांच्यासह संदीप शिरसाठ, प्रवीण लहाने, जान्हवी जगताप यांचे मार्गदर्शन लाभत आहे. विजेत्या खेळाडूंचे गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनील सुतवणे, डॉ. वाय.एस. खेडकर शाळेचे मुख्याध्यापक पी.के. सिब्बी यांनी अभिनंदन केले.सिद्धी येवले ९ वर्षांखालील ३० किलो गटात दोन्ही प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी करीत रौप्यपदक मिळवले. अभिजित गवई याने १३ वर्षांखालील ४० किलो वजन गटात कुमिते प्रकारात कास्यपदक आपल्या नावे केले. अभिजित मदनेने कुमिते प्रकारात ४० किलो गटात कास्यपदक राखले. ४५ किलो वजन गटात कुमिते प्रकारात उमेश वनवेने कास्यपदक जिंकले.
दिशा, श्रेयस, प्रियंका, जागृती यांना सुवर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 12:49 AM