औरंगाबाद : महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉक्टर बी.एस . नाईकवाडे यांना आज दुपारी मनपा आयुक्त डॉ .निपुण विनायक यांनी निलंबित केले.
महापालिकेतील वादग्रस्त कारकीर्द असलेले प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉक्टर बी.एस . नाईकवाडे यांच्यावर शहरातील कुत्र्यांची नसबंदी, प्राणिसंग्रहालयातील विविध कामे आणि सफारी पार्क कामात निष्काळजीपणा केल्यामुळे मनपा आयुक्त डॉ .निपुण विनायक यांनी निलंबित केले.
वादग्रस्त कारकीर्द नाईकवाडे महापालिकेत वादग्रस्त अधिकारी म्हणून ओळखले जातात. उद्यानात आलेला माकड अवैधरीत्या पकडून पिंजऱ्यात ठेवणे आदी अनेक कारनामे केल्याने ते चर्चेत होते. तसेच या आधी सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील बछड्यांच्या मृत्यू प्रकरणात नाईकवाडे यांना तत्कालीन मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी निलंबित केले होते. यावेळी तत्कालीन आयुक्तांनी त्यांचावर एक नव्हे दोन नव्हेतर तब्बल ९ आरोप ठेवले. यात हेमलकसा येथून रेणू आणि राजा या बिबट्याच्या जोडीला आणताना अक्षम्य हलगर्जीपणा करण्यात आला. रेणू मादी गरोदर असतानाही तिची योग्य ती काळजी घेण्यात आली नाही. गॅस्ट्रो समजून चुकीचे औषधोपचार करण्यात आले. या निष्काळजीपणामुळे रेणू वेळेपूर्वीच प्रसूत झाली. तिने तीन बछड्यांना जन्म दिला. त्यांचीही योग्य निगा, काळजी न घेतल्याने ते ४८ तासांतच मरण पावले. या सर्व प्रकारामुळे महापालिकेची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली. या घटनांना प्राणिसंग्रहालय संचालक म्हणून आपण जबाबदार असल्याचे आयुक्तांनी निलंबन आदेशात म्हटले होते. याच वेळी त्यांची विभागीय चौकशीही करण्याचे आदेशित करण्यात आले होते.