लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को आॅपरेटिव्ह सोसायटीच्या १४ संचालकांना वैजापूर सत्र न्यायालयाने गुरुवारी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. औैरंगाबादच्या सीआयडी विभागाने जळगाव येथील कारागृहातून या सर्वांना वैैजापूर कोर्टासमोर हजर केले असता विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस.बी. गायधने यांनी पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. वैजापूर तालुक्यातील ८५ गुंतवणूकदारांची एक कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर सीआयडी विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुधाकर सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-आॅपरेटिव्ह सोसायटीने २००९ मध्ये वैजापूर शहरात शाखा स्थापन केली. या शाखेत तालुक्यातील अनेक गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले. २००९ ते २०१४ या पाच वर्षांच्या कालावधीत सोसायटीत जवळपास एक कोटी ४० लाख रुपया़च्या ठेवी ठेवण्यात आल्या. परंतु सोसायटीने गुंतवणूकदारांची रक्कम परत न करता शहरातून आपला गाशा गुंडाळला व सर्व गुंतवणुकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली, अशी फिर्याद सेवानिवृत्त शिक्षक प्रदीप मथुरादास वेद यांनी २० नोव्हेंबर २०१५ रोजी वैजापूर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार सोसायटीच्या संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. पण त्यानंतर पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार हा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात आला. सीआयडीचे उपअधीक्षक सुरडकर यांनी केलेल्या तपासात वैजापूर तालुक्यातील ८५ गुंतवणुकदारांची फसवणुक झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर जळगाव येथील कारागृहात असलेल्या १४ संचालकांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना अटक करुन वैजापूर येथील न्यायालयासमोर हजर केले. फिर्यादीतर्फे सरकारी वकील महेश कदम यांनी काम पाहिले.महाराष्ट्रासह ७ राज्यांमध्ये २६४ शाखाबीएचआरच्या (भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-आॅपरेटिव्ह पतसंस्था) महाराष्ट्रासह ७ राज्यांमध्ये २६४ शाखा आहेत. महाराष्ट्रात २५२ शाखा आहेत. बीएचआर अडचणीत आल्यावर २ फेब्रुवारी २०१५ रोजी संस्थापक प्रमोद रायसोनींविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या पतसंस्थेच्या औरंगाबादसह मराठवाड्यातही अनेक शाखा होत्या. तेथील गुंतवणूकदारांचीही फसगत झाली आहे. आता ही संस्था बंद आहे.
‘बीएचआर’च्या संचालकांना वैजापूर येथे पोलीस कोठडी
By admin | Published: June 30, 2017 12:16 AM