छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील आजीवन व शिक्षण विस्तार विभागाचे प्रभारी संचालक डॉ. आनंद वाघ यांनी दिलेल्या राजीनाम्याचे पडसाद दुसऱ्या दिवशीही उमटले. प्राध्यापक संघटना, अधिसभा सदस्य आणि विद्यार्थी संघटनांनी डॉ. वाघ यांच्यावर दबाव टाकण्याचा आरोप असलेले राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. गजानन सानप यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करणारे निवेदन कुलपती तथा राज्यपालांना कुलगुरुंमार्फत पाठविले.
प्राध्यापक, अधिसभा, विद्या परिषद सदस्यांसह प्राध्यापक संघटनांनी कुलपतींना पाठविलेल्या निवेदनात म्हटले की, डॉ. सानप यांच्या जातीय द्वेषमूलक वर्तनाने विद्यापीठीय प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचारी भयभीत झाले आहेत. राज्यपाल नियुक्त सदस्य पदाचा दुरूपयोग करून धमकावत असतील तर ही गंभीर बाब आहे. यापूर्वीही त्यांनी एका प्राध्यापिकेस धमकावले होते. मात्र, नोकरीच्या भीतीपोटी कोणीही तक्रार करत नाही. राज्यपाल नियुक्त सदस्याचे वर्तन उच्चशिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारे आहे. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व तात्काळ रद्द करावे, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे, डॉ. राजेश करपे, डॉ. दिलीप अर्जुने, डॉ. उमाकांत राठोड, डॉ. हरिदास सोमवंशी, डॉ. संजय कांबळे, डॉ. बाप्पासाहेब म्हस्के, डॉ. शफी शेख, डॉ. दिलीप बिरुटे, डॉ. धनंजय रायबोले, डॉ. युवराज धबडगे, डॉ. मोहन सौंदर्य, डॉ. विश्वनाथ कोक्कर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
रिपब्लिकन विद्यार्थी सेनारिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मराठवाडा प्रमुख सचिन निकम यांनीही कुलपतींना निवेदन पाठविले आहे. डॉ. सानप हे विद्यापीठाची प्रतिमा मलिन करीत आहेत. त्यांच्या नियुक्तीपासून विद्यापीठाच्या प्रशासनात प्रचंड हस्तक्षेप करताना दिसून येत आहेत. त्यामुळे त्याचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.
राजभवनाला अहवाल देणारडॉ. वाघ यांनी प्रबोधनात्मक व्याख्यानमालेत भ्रष्टाचार करून विद्यापीठ व महाविद्यालयांकडून ५ ते १० हजार रुपये वसूल केले. त्यातून वाचण्यासाठी त्यांनी आरोप केले आहेत. गैरप्रकार करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात काम करण्यासाठीच माझी नियुक्ती झालेली आहे. या गैरप्रकाराच्या चौकशीचा अहवाल राजभवनाला सादर करणार आहे.- डॉ. गजानन सानप, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य