वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक क्षेत्रात कचरा टाकण्याचे प्रमाण वाढल्याने उद्योगनगरीतील मुख्य रस्त्यावर कचऱ्याचे ढिग साचले आहेत. कचरा अनेक दिवस तसाच जागेवर पडून रहात असल्याने उद्योजक व कामगारांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.
येथील ई, एफ, जी व के सेक्टर मधील मुख्य रस्त्यावर काही व्यवसायिकांसह नागरिक कचरा आणून टाकत आहेत. त्यामुळे अनेक कंपन्यांसमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा जमा होत आहे. प्लॅस्टिक कचरा तर संपूर्ण रस्त्यावर पसरला आहे. एमआयडीसीकडून हा कचरा वेळेत उचलला जात नाही. कचरा सडल्यामुळे परिसरात दुर्गंधी व डासांचा फैलाव वाढला आहे.
उग्र वासामुळे मळमळ, डोकेदुखी तसेच श्वास घेण्यास त्रास होत असल्याने कामगारांना काम करणे अवघड झाले आहे. तसेच कचºयाला आग लागण्याच्या घटना घडत आहेत. एमआयडीसी प्रशासनाने याकडे लक्ष देवून उघड्यावर कचरा फेकरणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.