औरंगाबाद : औषधोपचाराचा खर्च झेपत नसल्याने संतप्त झालेल्या कामगार पित्याने आपल्या अपंग मुलास चक्क युनायटेड स्पिरिट या कंपनीच्या दारातच आणून टाकल्याची घटना सोमवारी घडली. लाला शिंदे, असे या कामगाराचे नाव असून, त्यांच्यासह २२ जणांना जानेवारी महिन्यात कामावरून काढून टाकण्यात आले होते.मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील युनायटेड स्पिरिटची डायगो या अमेरिकन कंपनीस विक्री केली आहे. डायगोकडे कंपनीचे हस्तांतरण करण्यापूर्वी कामगारांचा वेतनवाढीसाठी लढा सुरू होता. यावरून १८ जानेवारी रोजी कामगारांनी ठिय्या आंदोलन केले. आंदोलन करणाऱ्यांपैकी २२ जणांना कंपनीने २३ जानेवारीपासून कामावरून काढून टाकले. लाला शिंदे, सुरेश मेश्राम, नंदकिशोर वाणी, जयेंद्र हिवराळे, सुरेश हिवराळे, रमेश इंगळे, राजू तुपे, सोमीनाथ ससाणे, अलका मगरे, कृष्णा कांबळे, बाबूराव पगारे, रवी खंडाळे, भास्कर जाधव आदींचा यात समावेश आहे. काढून टाकण्यात आलेले २२ कामगार हे गेल्या १८ वर्षांपासून कंपनीच्या सेवेत आहेत, हे विशेष. घरी नेणार नाहीलाला शिंदे यांच्या पत्नी अलका यांनी दुपारी अडीच वाजता अक्षयला घेऊन कंपनी गाठली. ‘आपल्या पतीला नोकरीला घ्या, नसता मुलाला येथेच सोडते,’ असे म्हणून त्यांनी अक्षयला एका कंपनीच्या दरवाजात चादरीवरच झोपविले. सायंकाळी सात वाजेपर्यंत या प्रतिनिधीने ‘युनायटेड स्पिरिट’ला भेट दिली असता, आजारी असलेला अपंग मुलगा दरवाजातच पडून असल्याचे दिसून आले. याबाबत कंपनीच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी बोलण्यास नकार दिला. अलका शिंदे यांनी सांगितले की, ‘अक्षयच्या पालनपोषणासाठी दरमहा तीन ते साडेतीन हजार रुपये खर्च येतो. पतीला कामावरून काढून टाकण्यात आल्याने संपूर्ण कुटुंबाचीच आबाळ होत आहे. अशा परिस्थितीत अपंग मुलाचा सांभाळ करणे अत्यंत कठीण होत आहे.’ कंपनीतील काही अधिकाऱ्यांनी आपली भेट घेतली. ‘तुमच्या पतीला येत्या १ जुलैपासून कामावर घेऊ, पण मुलाला येथून घेऊन जा,’अशी मागणी त्यांनी केली. परंतु लगेचच कामावर रुजू करून घेतल्याशिवाय मुलाला परत घेऊन जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.या घटनेची माहिती सर्वत्र पसरली. त्यामुळे कंपनीने काढून टाकलेले सर्व २२ कामगार येथे जमा झाले. कंपनीच्या गेटवर सुरक्षारक्षक तसेच काही बाऊंसरही हजर होते. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अपंग मुलाला टाकले कंपनीच्या दारात
By admin | Published: June 21, 2016 1:05 AM