जालना : मॉडेल रेल्वेस्थानक म्हणून ओळखले जाणाऱ्या जालना रेल्वेस्थानकाची रविवारी नांदेड विभागाचे महाव्यवस्थापक पी.सी. शर्मा यांनी पाहणी केली. मात्र तेथे आढळून आलेल्या अव्यवस्थेमुळे त्यांनी नाराजी व्यक्त करून व्यवस्था सुधारण्याचे आदेश दिले.दुपारी १ वाजता महाव्यवस्थापक शर्मा जालना रेल्वेस्थानकावर पोहोचले. त्यानंतर त्यांनी स्थानकावर सर्व भागात जाऊन येथील व्यवस्थेची पाहणी केली. प्लॅटफार्मवर तुटलेले बेंच, सार्वजनिक नळाजवळ दुर्गंधी, तुटलेले नळ त्यांना दिसून आले. शिवाय स्थानकावर भिंतींना लागलेले जाळे, तुटलेली फरशीही त्यांनी पाहिली. स्थानकावर नवीन इमारतीचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. या सर्व बाबींमुळे शर्मा यांनी नाराजी व्यक्त केली.स्थानकाजवळील रेल्वे गेट बंद असताना नागरिक तेथून गेटच्या खालून वाहने घेऊन ये-जा करताना शर्मा यांना आढळून आले. या रेल्वेगेटवर भूमिगत पूल बनविण्याची मागणी नागरिकांनी यापूर्वी केलेली असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी शर्मा यांना सांगितले. कॅन्टीनवर विक्री होणारी खाद्यपेये, चहा, कॉफीच्या नमुन्यांचीही त्यांनी तपासणी केली. महाव्यवस्थापकांसमवेत रेल्वेचे अधिकारी वानखेडे, डॉ. माथुर, डॉ. कुरलीकर, स्थानकप्रमुख वळवी आदींची उपस्थिती होती.जालना रेल्वेस्थानकाजवळील रेल्वेगेट बंद होत असल्यामुळे तेथे वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे या ठिकाणी भूमिगत पूल तयार करण्यात यावा, अशी मागणीही प्रवाशांच्या वतीने करण्यात आली. दरेगाव औद्योगिक वसाहत परिसरात क्रॉसिंग गेट क्रमांक तयार करण्याची मागणीही करण्यात आली. जालना रेल्वेस्थानकावर एटीएम तसेच सी.सी.टी.व्ही. लावण्याची मागणी करण्यात आली. निवेदन सादर करणाऱ्या शिष्टमंडळात जालना रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेशलाल चौधरी, प्रकाश जैन, मो. फेरोजअली, अॅड. दुर्गादास कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)... अन् स्थानक झाले चकचकीतमहाव्यवस्थापक शर्मा हे आज तपासणीसाठी येणार असल्याने गेल्या अनेक दिवसांच्या तुलनेत स्थानक चकचकीत करण्यात आले. मात्र तरीही काही त्रुटी राहिल्याने झाडू घेऊन कामगार सफाई करताना आढळून आले. प्लॅटफॉर्मवर दुर्गंधी नव्हती. एवढेच नव्हे तर रेल्वे पटरीवर सुद्धा दुर्गंधी दिसून आली नाही. अचानक स्थानक चकचकीत कसे झाले, याविषयी प्रवाशांमध्ये चर्चा सुरू होती. बंद गेट मधून सुरू असलेली वाहतूकही पाहिलीजालना रेल्वेस्थानकानजीक असलेल्या रेल्वेगेटवर गेट बंद असतानाही नेहमी नागरिकांची विशेषत: वाहनधारकांची ये-जा सुरू असते. महाव्यवस्थापक शर्मा हे स्थानकाच्या परिसराची पाहणी करत असताना त्यांना हा प्रकार दिसला. या गेटवर भूमिगत पूल असावा, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांमधून होत आहे. मात्र रेल्वे प्रशासनाने याबाबत काहीच भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे भूमिगत पूल तयार करून नागरिकांची अडचण दूर करावी, अशी मागणी शर्मा यांच्याकडे काही संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी केली. महाव्यवस्थापक पी. सी. शर्मा यांना यावेळी काही संघटनांच्या वतीने निवेदने सादर करण्यात आली. जालना रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने दिलेल्या निवेदनाद्वारे जनशताब्दी एक्स्प्रेसला औरंगाबाद ऐवजी जालन्यातून सोडावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. हैद्राबाद-औरंगाबाद पॅसेंजरची वेळ एक तास अगोदर करावी. कारण त्याद्वारे येणारे प्रवासी परभणी, सेलूपर्यंत वेळेवर येतात. मात्र सेलू येथून औरंगाबाद येथे जाण्यासाठी सुमारे २ ते ३ तासांचा कालावधी लागतो, असेही त्यात नमूद करण्यात आले.
अव्यवस्थेमुळे ‘डीआरएम’ ची नाराजी
By admin | Published: June 16, 2014 12:16 AM