औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील प्रसूती कक्षाच्या परिसरातील जुन्या ‘एनआयसीयू’च्या प्रवेशद्वाराजवळच इलेक्ट्रिक बोर्डमध्ये स्पार्किंग होऊन आग लागण्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी घडली. स्पार्किंगमुळे इलेक्ट्रिक बोर्डमधून धूर निघत होता. या वेळी ‘एनआयसीयू’मध्ये १८ शिशू होते. सुदैवाने सुरक्षारक्षकांनी वेळीच धाव घेऊन आग आटोक्यात आणली. त्यामुळे घाटीत भंडारा घटनेची पुनरावृत्ती टळली आणि सर्व शिशू सुखरूप राहिले.
घाटीतील प्रसूती कक्षाच्या (लेबर रूम) परिसरात जुने ‘एनआयसीयू’ आहे. या ‘एनआयसीयू’च्या प्रवेशद्वाराला लागूनच इलेक्ट्रिक बोर्ड आहे. सायंकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास या बाेर्डमध्ये अचानक स्पार्किंग झाले. या बोर्डमधून धूर निघत असल्याचे कर्तव्यावरील ‘एमएसएफ’च्या महिला सुरक्षारक्षक जया भगत आणि मीना जाधव यांच्या निदर्शनास आले. त्यांनी हा प्रकार तत्काळ सुरक्षा पर्यवेक्षक अरविंद घुले यांना कळविला. तेव्हा अरविंद घुले यांच्यासह सुरक्षारक्षक रामेश्वर नागरे, गौरव साळुंखे यांनी लेबर रूमकडे धाव घेतली. ज्या ठिकाणाहून धूर निघत होता, त्या ठिकाणी अग्निरोधक सिलिंडरचा मारा केला. त्यामुळे कोणतीही मोठी घटना घडली नाही. या घटनेनंतर इलेक्ट्रिक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी इलेक्ट्रिक बोर्ड दुरुस्त केला. जवानांच्या तत्परतेविषयी कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.
सर्व सुरळीत, मोठी घटना नाही‘एनआयसीयू’त कोणताही घटना झालेली नाही. प्रसूती कक्षातून (लेबर) आलेल्या वायरिंगच्या इलेक्ट्रिक बोर्डमध्ये स्पार्किंग झाले होते. ‘एनआयसीयू’त दाखल सर्व १८ शिशू सुखरूप आहेत. कोणतीही मोठी घटना नव्हती. सर्व उपकरणे काम करीत होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली आहे. दोन वर्षांपूर्वीच वायरिंग झालेली आहे, असे नवजात शिशू विभागाचे डाॅ. अमोल जोशी यांनी सांगितले. प्रसूती विभागातील विद्युतीकरणाचे ऑडिट करण्याची मागणी विद्युत विभागाकडे करण्यात आल्याचे डाॅ. श्रीनिवास गडप्पा म्हणाले.
दोन वर्षांपूर्वी पसरला होता धूरप्रसूती कक्षाच्या परिसरात दोन वर्षांपूर्वी शाॅर्ट सर्किटमुळे धूर पसरला होता. तेव्हा याच ठिकाणी असलेल्या जुन्या ‘एनआयसीयू’तील शिशूंना वेळीच बाहेर नेण्यात आल्याने त्या वेळीही मोठी दुर्घटना टळली होती. या वेळी सुदैवाने शिशूंना बाहेर काढण्याची वेळ ओढावली नाही. परंतु त्यानंतरही स्थिती ‘जैसे थे’ असल्याची स्थिती आहे.
जुन्या वायरिंग धोकादायक, ऑडिट कागदावरचघाटीत काही दिवसांपूर्वीच फायर ऑडिट करण्यात आले. परंतु इलेक्ट्रिक ऑडिट कागदावरच असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे दुर्घटनांना वारंवार आमंत्रण मिळत आहे. ‘लोकमत’ने १० जानेवारी रोजी नवजात शिशू वॉर्डाच्या जोखमीच्या स्थितीविषयी सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते.