छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील २५ हजार विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येणार आहेत. नवीन वर्षात या उपक्रमाची ग्रामीण १८ व शहरातील २ शाळांमध्ये सुरुवात होणार आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा-महाविद्यालयांची निवड करण्यात आली असून, रोज एका शाळेत जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारीत असलेल्या आपत्ती व्यवस्थापन विभागाची टीम प्रशिक्षण देण्यासाठी जाणार आहे. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या हस्ते या उपक्रमाचा नवीन वर्षात शुभारंभ हाेईल, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मारुती म्हस्के यांनी सांगितले.
जिल्ह्यातील एक हजारावर पटसंख्या असणाऱ्या २० माध्यमिक-उच्च माध्यमिक शाळांची निवड केली आहे. त्यातील दोन शाळा या शहरातील आहेत. अपघात व वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीच्या धर्तीवर विद्यार्थ्यांना शालेय आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले जाणार आहेत. माध्यमिक, उच्च माध्यमिक यातील विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन विभागातील पथकासह शासकीय कर्मचारी माहिती देतील. जिल्ह्यात काही तालुक्यांतील अनेक शाळा गावापासून दूर दुर्गम भागात आहेत. काही शाळा पत्र्यांच्या आहेत. शाळांपासून गाव, दवाखाने, पोलिस ठाणे दूर आहेत. यावेळी विद्यार्थ्यांना काही आपत्कालीन संकट आले तर काळजी घेत काय उपाययोजना करायची, याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षणादरम्यान दाखविले जाणार आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी गॅस सेफ्टी कार्यक्रमांतर्गत गॅस गळती यासारखी दुर्घटना घडली किंवा स्फोट झाला तर काय काळजी घ्यायची, याची माहिती देण्यात येणार आहे.
या आपत्तीचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन...भूकंप, साथरोग, रस्ते अपघात, सर्पदंश, आगीपासून संरक्षण, पूर परिस्थिती, वीज पडणे, दुष्काळ संबंधी आपत्ती व्यवस्थापन विभागाने नेमलेले पथक विद्यार्थ्यांना काय करावे, काय करु नये यासंबंधी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करतील.