शहरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना तातडीने मदत करण्यासाठी महापालिका प्रशासनाने डिझास्टर मॅनेजमेंट टीमची स्थापना केली आहे. ही टीम नेहमीप्रमाणे कागदावरच दिसून आली. या टीमचा एकही सदस्य नागरिकांच्या मदतीसाठी कुठेही आला नाही. महापालिकेचे आपत्कालीन नियंत्रण कक्ष सुरू आहे; पण तेथील दूरध्वनी तब्बल तीन महिन्यांपासून बंद आहे. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सर्व यंत्रणेला यापूर्वीच सूचना दिलेल्या आहेत.
खाम नदीपात्र तुडुंब
हर्सूल तलावापासून खाम नदीपात्राला सुरुवात होते. रात्रीच्या पावसाने ९.३० वाजता पात्र तुडुंब भरले होते. पात्राच्या आसपास अनेक वसाहती आहेत. मात्र, या वसाहतींमध्ये पाणी शिरले नव्हते. परिसरातील जलाल कॉलनी, हिलाल कॉलनीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.
नूर कॉलनी पाण्यात
टाऊन हॉल भागातील नूर कॉलनीत मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. नागरिकांनी फायर ब्रिग्रेडला सतत फोन करण्याचा प्रयत्न केला; पण संपर्क झाला नाही. या भागातील २५ ते ३० घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. इतर घरांमध्ये कमी प्रमाणात पाणी गेले. रात्री उशिरापर्यंत नागरिक स्वत:च पाणी काढण्याचे काम करीत होते.
अग्निशमन एकाच वेळी कुठे-कुठे जाणार
रात्री ८ वाजेपासून अग्निशमन विभागाचे फोन सतत खणखणत होते. शहराच्या वेगवेगळ्या भागांतील घरांमध्ये, दुकानांमध्ये पाणी शिरल्याच्या तक्रारी प्राप्त होत्या. त्यातच काही ठिकाणी झाडे कोसळली होती. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रात्री कंटाळून आपले मोबाइल बंद केले. पदमपुरा, सिडको येथील गाड्या वेगवेगळ्या भागांत धावपळ करीत होत्या.