पैठण : जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी दुपारनंतर अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धरणातून रात्री ३७,७२८ क्युसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात आला. रात्री ८ ते ८.३० वाजेदरम्यान धरणाचे १८ दरवाजे दोन फुटांनी वर उचलण्यात आले. यात धरणाखालील पूल पाण्याखाली गेला असून, दक्षिण जायकवाडीकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. दरम्यान, गोदाकाठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
रविवारी दुपारपर्यंत धरणातून २५,१५२ क्युसेक विसर्ग जायकवाडी धरणाच्या १८ दरवाजांतून सुरू होता, तर धरणामध्ये २१,४४२ क्युसेक आवक होत होती. आवक व विसर्ग, असा असताना धरणाचा जलसाठा ९९.४४ टक्के कायम होता. मात्र, दुपारनंतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने रात्री धरणाचे १८ दरवाजे दोन फुटांनी वर उचलून धरणातून १२,५७६ क्युसेक विसर्ग वाढविण्यात आला. त्यामुळे धरणातून ३७,७२८ क्युसेक विसर्ग सुरू होता. गोदावरी पात्रात मोठ्या क्षमतेने विसर्ग सुरू झाल्याने धरणाखालील पूल पाण्याखाली गेला होता. धरण काठोकाठ भरत आले असताना येणारे पाणी सामावून घेण्यासाठी धरणातून विसर्ग वाढविण्यात आला असून, धरणाचा जलसाठा ९८.४० टक्के इतका कमी करण्यात येईल, असे जायकवाडीचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.
रविवारी सायंकाळी नाथसागराची पाणीपातळी १,५२१.९० फुटांपर्यंत, तर ४६३.८७५ मीटरमध्ये झाली होती. धरणात आवक २१,४४२ क्युसेक होत होती. धरणाचा एकूण जलसाठा २,८९७.१०० दलघमी, तर जिवंत पाणीसाठा २,१५८.९९४ दलघमी झालेला आहे. धरणाची टक्केवारी ९९.४४ टक्के झाली असून, उजव्या कालव्यातून ६०० क्युसेक व डाव्या कालव्यातून १,५०० क्युसेक विसर्ग सुरू आहे, असे धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे यांनी सांगितले. आवक लक्षात घेता धरणातून होणाऱ्या विसर्गात वाढ किंवा घट होऊ शकते, असे राजेंद्र काळे म्हणाले.
धरणाकडे जाणारे रस्ते पोलिसांकडून बंद जायकवाडी धरणाकडे जाणारे सर्व रस्ते पोलिसांनी बंद केले असून, तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. धरण परिसरात पायी जाण्यासही मज्जाव करण्यात आला आहे. धरणातून पाणी सोडल्यानंतर पर्यटकांची गर्दी होते. कोविडच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये म्हणून प्रशासनाने पर्यटकांना बंदी घातली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी दिली.