पैठण (औरंगाबाद ) : जायकवाडी धरणातून ( Jayakwadi Dam ) गेल्या १९ दिवसात ४६ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. १००% जलसाठा झालेल्या धरणात मागील पाच दिवसापासून जेवढी आवक ( From Three Consecutive Year Water released from Jayakwadi Dam ) तेवढा विसर्ग करण्यात येत आहे. रविवारी धरणाच्या दहा दरवाजातून ५२४० क्युसेस विसर्ग सुरू होता. धरणाच्या इतिहासात २००६, २०२० व २०२१ या तीन वर्षात सर्वाधिक पाणी सोडण्यात आले आहे.
जायकवाडी धरणातून यंदा २९ सप्टेंबर रोजी सकाळी विसर्ग करण्यास प्रारंभ करण्यात आला. आजतागायत विसर्ग सुरू आहे. २००६ ला धरणातून धरण पूर्ण क्षमतेने भरेल एवढे पाणी खाली सोडण्यात आले होते. यानंतर २०२० ला ८० टीएमसी पाणी सोडावे लागले होते. यंदा गेल्या १९ दिवसात १३११ दलघमी ४६ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे अशी माहिती धरण अभियंता विजय काकडे यांनी दिली. नाशिक जिल्ह्यातील धरण समूहावर भिस्त असलेल्या जायकवाडी धरणात २००९ ते १६ दरम्यान सलग आठ वर्ष अपेक्षित जलसाठा न झाल्याने कपात करून पाणी वापरण्याची वेळ मराठवाड्यावर आली होती. परंतू गेल्या दोन वर्षापासून नाशिक पेक्षा स्थानिक पाणलोटक्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्याने याच पावसावर जायकवाडी धरण मोठ्या प्रमाणावर भरल्याचे समोर आले आहे. सलगपणे तीन वर्ष धरणातून पाणी सोडण्याची धरणाच्या इतिहासातील ही तिसरी वेळ आहे.
स्थानिक पाणलोटक्षेत्रातील पावसावर धरण भरत असल्याने मराठवाड्यासाठी हा मोठा दिलासा असून जायकवाडी आत्मनिर्भर होत असल्याचे हे संकेत आहेत. धरणाच्या ४६ वर्षाच्या इतिहासात पाणी सोडण्याचे हे २२ वे वर्ष आहे. जायकवाडी धरणाच्या इतिहासात सुरवातीच्या काळात १९७५ ते १९८१ असे सलग सात वर्ष धरणातून विसर्ग करावा लागला. दुसऱ्यांदा सन २००५ ते २००८ असा सलग चार वर्ष विसर्ग झाला. यानंतर सन २०१९ ते २०२१ असा सलग तीन वर्ष विसर्ग होत आहे.