औरंगाबाद : शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शहर वाहतूक शाखा पोलिसांकडून दररोज नियम मोडणाऱ्या सुमारे २५० वाहनधारकांवर कारवाई करण्यात येत आहे. प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आदेशाने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी ५ पथके स्थापन करण्यात आल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांनी मंगळवारी दिली.
विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, प्रवेश बंदीचे नियम तोडणे, दुचाकीवर ट्रीपल सीट, हेल्मेट न वापरणे, फॅन्सी नंबरप्लेट, वाहनांची कागदपत्रे जवळ न बाळगणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या आदेशाने ५ पथके नेमण्यात आली आहेत. ही पथके शहराच्या विविध भागांत जाऊन दररोज वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या २०० ते २५० जणांवर कारवाई करीत आहेत. कारवाईत सापडलेले वाहन जप्त करून ते छावणी पोलीस ठाण्यात नेण्यात येते.
शहर वाहतूक शाखा पोलिसांनी पाच ते सहा दिवसांपासून शहराच्या विविध भागांत कारवाई करून आतापर्यंत १ हजार १५० वाहनधारकांकडून विविध कलमान्वये दंड वसूल केल्याचे पोलीस निरीक्षक सावंत यांनी सांगितले. तसेच रस्त्यावर हातगाड्या उभ्या करून व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध देखील शहर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
समुपदेशनाचा पाढावाहनधारकाला मोंढानाका चौकातील शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात बोलावून त्याला वाहतुकीचे नियम मोडल्यावर काय होते, याबाबतची एक व्हिडिओ क्लिप दाखवून पोलिसांच्या वतीने १ तास समुपदेशन करण्यात येते. त्यानंतर वाहनधारकावर दंडात्मक कारवाई करून त्याला सोडून देण्यात येते, असे पोलीस निरीक्षक सावंत यांनी सांगितले.