छत्रपती संभाजीनगर :पोलिस आयुक्तांनी कालच सहायक पोलिस आयुक्तांना पदस्थापना देण्यासह सात पोलिस निरीक्षकांची खांदेपालट केली होती. पाच निरीक्षकांनी तात्काळ बदलीच्या ठिकाणी रुजू होत पदभार स्वीकारला तर दोन वरिष्ठ निरीक्षकांनी बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यास नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घडामोडी होत असताना ३७६ पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी मंगळवारी सायंकाळी काढले.
आयुक्तालयातील अनेक कर्मचाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला असल्यामुळे त्यांच्या बदल्यांचे आदेश पोलिस आयुक्तांनी मंगळवारी रात्री काढले. यात १४ ग्रेड पोलिस उपनिरीक्षक, ११० हवालदार, ६१ पोलिस अंमलदार आणि १९१ पोलिस नाईक अशा ३७६ जणांचा समावेश आहे. दरम्यान, सोमवारी रात्री उशिरा काढलेल्या पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांमधील गुन्हे शाखेत संदीप गुरमे, एमआयडीसी वाळूजमध्ये अविनाश आघाव, वाळूजमध्ये पदभार गिता बागवडे, वाळूज वाहतूक विभागात सचिन इंगोले तर सिटीचौक ठाण्यात विठ्ठल पोटे रुजू झाले. वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी यांनी उस्मानपुरा आणि दिलीप गांगुर्डे यांनी बेगमपुरा ठाण्याचा पदभार स्वीकारला नाही. निरीक्षक गिरी यांनी सिडको, सिटीचौक आदी ठाणे सांभाळले आहेत. एपीआय दर्जाच्या उस्मानपुरा पोलिस ठाण्यात त्यांची बदली झाल्यामुळे ते नाराज असल्याचे समजते. बेगमपुऱ्यात बदली झालेले दिलीप गांगुर्डे आजारी रजेवर गेले आहेत. त्यांची चार महिन्यांपूर्वी पुंडलिकनगरातून वाळूज वाहतूक शाखेत बदली झाली होती. ते मॅटमध्येही बदलीला आव्हान देणार असल्याची चर्चा पोलिस विभागात आहे. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेचा अतिरिक्त पदभार अविनाश आघाव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
पोलिस विभागात नाराजीचा सूरपोलिस निरीक्षकांच्या झालेल्या बदल्यांमुळे काही अधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. चार महिन्यात गांगुर्डे यांची बदली केली जाते. दुय्यम दर्जाचे पोलिस ठाणे वरिष्ठ निरीक्षकांना देण्यात येते. त्याचवेळी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याने आरोप केलेल्या, वादग्रस्त अधिकाऱ्यास थेट गुन्हे शाखा मिळते. काही अधिकाऱ्यांना पाहिजे ते कर्मचारी, अधिकारी सोबतीला मिळतात. याविषयी जोरदार चर्चा पोलिस विभागात करण्यात येत आहे.