औरंगाबाद : महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयांतर्गत मराठवाडा व खान्देशातील ११ जिल्ह्यांमध्ये सुमारे सव्वापाच लाख ग्राहक हे दरमहा ‘आॅनलाईन’ वीज बिल भरतात. यापुढे ‘आॅनलाईन’ बिल भरणाऱ्यांना विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार ०.२५ टक्के सूट मिळणार आहे.
ही सूट वीज बिल भरण्यासाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय, भीम अॅप, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, मोबाईल वॉलेट, महावितरण अॅपचा वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी असली तरी ती लघुदाब वर्गवारीमधील ग्राहकांच्या मासिक विद्युत देयकामध्ये प्रति महिना ५०० रुपये मर्यादेच्या अधीन असेल. आयोगाने मान्य केलेला महावितरणच्या दरवाढीचा प्रस्ताव हा १ सप्टेंबरपासून लागू करण्यात आला. त्याचवेळी आयोगाने ग्राहकांसाठी काही सवलतीही देण्याचे निर्देश दिले.
धार्मिक उत्सवासाठी लागू वीज दर हा यापुढे ‘सर्क स’ उद्योगालाही लागू केला आहे. याशिवाय इस्त्री सेवा उद्योगाची (लॉण्ड्री) वर्गवारी आता लघुदाब उद्योग- ३ अंतर्गत केली आहे. यापूर्वी हा उद्योग वाणिज्यिक वर्गवारीमध्ये समाविष्ट होता. याशिवाय कचरा व्यवस्थापन प्रक्रियेचाही विचार आयोगाने केला आहे. विद्युत पुरवठ्यासाठी शासकीय सार्वजनिक सेवा आणि अन्य सार्वजनिक सेवा, अशी वर्गवारी करण्यात आली आहे.