औरंगाबाद : डॉ. राजन शिंदे यांच्या खुनाचा तपास ( Dr. Rajan Shinde murder case) करीत असलेले विशेष चौकशी पथक (एसआयटी) बुधवारी (दि. १३) उस्मानाबादेत धडकले. या पथकाने डॉ. शिंदे यांच्या पत्नी डॉ. मनीषा यांनी ज्या सहकाऱ्यांशी खुनाच्या घटनेनंतर संपर्क साधला, त्यांची कसून चौकशी केली. त्याशिवाय इतरही सहकाऱ्यांचे कॉल डिटेल्स तपासत जबाब नोंदवल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, औरंगाबादेत पथकाने दिवसभर हत्यारांचा कसून शोध घेतला.
मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात डॉ. शिंदे यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, सोमवारी (दि. ११) सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी झोपेतून उठल्यानंतर पती रक्ताच्या थारोळ्यात उताण्यास्थितीत पडलेले दिसले. तेव्हा दोन्ही मुले घरात नव्हती. मुले घरात आल्यानंतर त्यांना कुठे गेलात, असे विचारल्यानंतर त्यांनी पोलिसांची मदत घेण्यासाठी गेलो असल्याचे सांगितले. या फिर्यादीनंतर पोलिसांच्या पथकांनी घेतलेल्या जबाबातही पत्नी फिर्यादीतील माहितीवर ठाम राहिल्या आहेत. मात्र, त्यांच्या मोबाइलच्या सीडीआरमधून वेगळीच माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यांनी घटनेनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद येथील उपकेंद्रातील एका सहकाऱ्याशी सोमवारी (दि. ११) पहाटे ५ वाजून १२ मिनिटांनी संपर्क साधून पतीचा खून झाला असून, आज ड्यूटीवर येणार नसल्याचे कळविले. त्यानंतर शेजाऱ्यासह इतरांशी ६ वाजेपूर्वीच अनेक कॉल केले असल्याचे जप्त केलेल्या मोबाइलच्या सीडीआरवरून स्पष्ट झाले आहे. डॉ. शिंदे यांच्या पत्नीच्या जबाबातील हीच विसंगती पोलिसांच्या चौकशी पथकाने टिपली असून, त्याच्या शोधासाठी एसआयटीतील सदस्यांच्या एका पथकाने उस्मानाबाद गाठले. विद्यापीठाच्या उपकेंद्रातील पहिला संपर्क साधलेल्या व्यक्तीसह इतर सहकाऱ्यांचेही जबाब नोंदवले. त्यांच्या मोबाइलचे डिटेल्सही ताब्यात घेतले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बुधवारी तपास पथकाचे प्रमुख निरीक्षक अविनाश आघाव, सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, मनोज शिंदे, उपनिरीक्षक दत्ता शेळके, अमोल मस्के, राहुल चव्हाण यांच्यासह सहकाऱ्यांनी कसून तपास केला.
विहिरी, रस्ते व परिसर पिंजून काढलाडॉ. शिंदे यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या हत्यारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या पथकाने अग्निशमन दलाच्या मदतीने बुधवारी जोरदार अभियान राबविले. डॉ. शिंदे यांच्या घराच्या परिसरातील तीन विहिरीची तपासणी करण्यात आली. याशिवाय पहाटे साडेचार वाजताच घराच्या परिसरातून बाहेर पडलेल्या गाडीचे रस्ते तपासले. यात रस्त्याच्या दुभाजक, साइडच्या कचराकुंड्यात हत्यार, कपडे टाकण्यात आले का, याचाही तपास पोलिसांनी केला. तसेच या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेजही मिळविले. विहिरींमध्ये गळ टाकून कपडे, हत्यारांचा शोध घेतला. मात्र, बुधवारी रात्रीपर्यंत पोलिसांच्या हाती कोणताही ठोस पुरावा लागलेला नाही.
ठोस पुराव्यानंतर घेणार ताब्यातआतापर्यंतच्या तपासात हत्या कोणी केली असावी, आरोपी कोण आहेत, या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले आहेत. मात्र, ठोस पुरावा मिळाल्यानंतर संशयिताना ताब्यात घेण्याची रणनीती पोलिसांनी बनविली आहे. त्यासाठीच तांत्रिकसह इतर पुरावे जोडण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या सर्व तपासात डॉ. शिंदे यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मोबाइलचे सीडीआर महत्त्वाचे ठरणार आहेत.
तेव्हा मुकुंदवाडी आता चिश्तियाडॉ. शिंदे यांच्या काही महिन्यांपूर्वी मोबाइल हरवला होता. तेव्हा मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली होती. मात्र, वडिलांचा खून केल्यानंतर पोलिसांची मदत मिळविण्यासाठी दूरवरच्या सिडकोतील चिश्तिया चौकी गाठली. त्यावरून पोलीस ठाणे माहिती असताना, दुसरीकडेच जाण्याचा बनाव का केला, याचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : - प्रा. राजन शिंदे यांचा मारेकरी कोण ? कुटुंबातील सदस्यांचे चौकशीत पोलिसांना असहकार्य- ...अन् पोलीस आयुक्तांनी चार तास ठाण मांडले; संशयाची सुई कुटुंबियांकडे ?