औरंगाबाद : भाजपशी एकनिष्ठ राहिलात तर त्याचे निश्चितच फळ मिळेल. तीन वेळा आमदार झाल्यानंतर शेवटच्या चार महिन्यांत मला मंत्रीपद मिळाले. पक्षाच्या प्रतिमेला गालबोट लागेल असे काही करू नका. एक वेळ घरात भांडण करा; पण बाहेर एकजुटीने पडा, असा कानमंत्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांनी भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना दिला.
भाजपच्या विभागीय कार्यालयात सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत बोलताना खाडे म्हणाले, भाजपच्या राज्य सरकारने अनुसूचित जातीच्या उन्नतीसाठी पूर्वीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये ७६० कोटी रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे पैशाची कमतरता भासणार नाही. विधानसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विविध कामे मार्गी लागली पाहिजेत. यासाठी कार्यकर्त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा, आवश्यकता असेल तर माझ्या कार्यालयाशीही संपर्क साधवा.
निधी असताना पैसे खर्च न झाल्यास त्यात अधिकाऱ्यांना दोषी धरण्यात येईल. तशा पद्धतीच्या सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यानंतर त्याचे फळ निश्चितच मिळते. सुरुवातीला मीसुद्धा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पक्षात काम करीत होतो. भाजपत प्रवेश घेतल्यानंतरच आमदार झालो. राष्ट्रवादी-काँग्रेसशी युती असतानाही आठवले यांनी मला आमदारकीच्या निवडणुकीत मदत केली. तेव्हापासून सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून कार्य केले.
मागील साडेचार वर्षांत सत्ता असताना कधीही मंत्रीपद किंवा इतर काही मागितले नाही. चार महिन्यांचा कालावधी राहिला असताना मुख्यमंत्र्यांनी थेट कॅबिनेट मंत्रीपदाची संधी दिली. त्यामुळे पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यास त्याचे चांगलेच फळ मिळते, असेही त्यांनी सांगितले. यावेळी भाजप जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष एकनाथ जाधव, जालिंदर शेंडगे, भाऊराव कुलकर्णी, अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष उत्तम अंभोरे, चंद्रकांत हिवराळे, बबन नरवडे, देवीदास काळे, बाबा तायडे आदी उपस्थित होते.