औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहर बससेवा सुरू करण्यासाठी महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या निविदा प्रक्रियेला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे बुधवारी निदर्शनास आले. चार नामांकित कंपन्यांनी बस गाड्या पुरविण्यासाठी होकार दर्शविला. मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी चारही कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत प्री-बीड मीटिंगमध्ये सविस्तर चर्चा केली.
औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या बैठकीत बस खरेदीचा निर्णयही सहा महिन्यांपूर्वी झाला. कंपनीच्या संचालक मंडळाने बस खरेदीच्या निविदा काढण्यास मान्यता दिली नव्हती. मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मुंबईला जाऊन स्मार्ट सिटीचे मेन्टॉर सुनील पोरवाल यांची भेट घेऊन परवानगीही मिळविली. त्यानंतर लगेचच निविदाही प्रसिद्ध केली. निविदेंतर्गत बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात इच्छुक कंपन्यांसोबत बैठक झाली.
औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पाेरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक, स्मार्ट सिटीचे नोडल अधिकारी सिकंदर अली यांच्यासमोर कंपन्यांनी सादरीकरण केले. व काही सूचनाही केल्या. यामध्ये अशोक लेलॅण्ड, टाटा, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, एसएमएल आणि आयशर या कंपन्यांच्या प्रतिनिधींचा समावेश होता.बैठकीत सुरुवातीला निविदेच्या अटी-शर्र्तींवर सविस्तर चर्चा झाली. काही अटी-शर्र्तींमध्ये बदल करण्याची सूचना प्रतिनिधींकडून करण्यात आली. या सर्व सूचनांचा विचार करून बस खरेदीच्या अटी-शर्ती अंतिम करण्यात येणार आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष निविदा दाखल करून घेण्यास सुरुवात होईल. निविदा दाखल करण्याची अंतिम मुदत ६ जुलै आहे. ९ जुलै रोजी प्राप्त निविदांमधील टेक्निकल बीड उघडण्यात येतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कमर्शिअल बीड उडण्यात येणार आहेत.बस खरेदीची निविदा प्रक्रिया महिनाभर चालणार आहे. त्यामुळे दिवाळीआधी बससेवा सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दहा मिनिटाला बस मिळावी असे नियोजनमहापालिका पहिल्या टप्प्यात १०० बसेस खरेदी करणार आहे. ९ मीटर लांबीच्या मिडी बसेस राहणार आहेत. यातील काही वातानुकूलित, तर काही विनावातानुकूलित राहणार आहेत. शहरातील २० ते २२ प्रमुख रस्त्यांवर किमान दहा मिनिटाला एक बस मिळावी यादृष्टीने अत्यंत सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. नंतर आणखी ५० बसेस खरेदी करण्यात येणार आहेत.