लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या घरी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शनिवारी सायंकाळी अर्धा ते पाऊणतास घालविला. चहापानाच्या निमित्ताने का होईना, राज्यपाल त्यांच्या घरी गेल्यामुळे राजकीय चर्चेला ऊत आला आहे, तर भाजपमधील काही लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा असलेल्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.राज्यपाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बागडे यांच्या निवासस्थानी शनिवारी जाणार होते. त्यानिमित्ताने त्यांच्या निवासस्थान परिसरातील रस्त्याचे तातडीने डांबरीकरणही करण्यात आले. मुख्यमंत्र्यांचा दौरा अचानक रद्द झाल्यामुळे राज्यपालांनीच बागडे यांच्या निवासस्थानी पाहुणचार घेतला.माजी राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनीही विधानसभा अध्यक्ष बागडे यांच्या निवासस्थानी राज्यपालांची भेट घेतली. मागील काही वर्षांपासून अडगळीला पडलेले गायकवाड अचानक भाजपच्या कार्यक्रमांत सक्रिय होऊ लागले आहेत. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि गायकवाड मंत्रिमंडळात होते. त्यामुळे त्यांनी राज्यपालांची आज भेट घेतल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
विधानसभा अध्यक्षांच्या घरी राज्यपालांची चाय पे चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 1:42 AM